नुकसानाचे पंचनामे तीन दिवसात पूर्ण करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 02:56 PM2019-11-04T14:56:36+5:302019-11-04T14:56:47+5:30
शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पावसाने झालेल्या नुकसानाच्या संकटसमयी शेतकऱ्यांनी घाबरून जावू नये, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. तरी नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे यंत्रणांनी पुढील तीन दिवसात पूर्ण करून शेतकºयांना तातडीने मदत द्यावी, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीक नुकसानासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन ३ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना ते बोलत होते. याप्रसंगी बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड, जिल्हाधिकारी डॉ. निरूपमा डांगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषि अधिकारी संतोष डाबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे आदी उपस्थित होते. विमा काढलेल्या शेतकºयांचे नुकसानाचे अर्ज कृषी मित्रांमार्फत गावातच भरून घेण्याचे सूचित करीत पालकमंत्री कुटे म्हणाले, शेतकºयांनी पीक विम्याचे नुकसानाचे अर्ज भरण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. विमा कंपनीने अत्यंत जबाबदारीने शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी. जिल्ह्यात सोयाबीन, ज्वारी व मका पिकाची १०० टक्के हानी झाली आहे. त्यामुळे या पिकांचे पंचनामे तत्काळ पूर्ण करावे. पंचनामे करताना अतीतपशीलवार न जाता सरसकट पूर्ण करावे. नुकसान झालेल्या तूर पिकाचा विमा काढला असल्यास कंपन्यांनी नुकसान ग्राह्य धरून तूर उत्पादक शेतकºयांनाही मदत द्यावी. सर्वे करताना अतिवृष्टी हा निकष नाही. त्यामुळे महसूल मंडळ अतिवृष्टीग्रस्त आहे काय, या निकषाचा विचार करू नये. हा अवकाळी पाऊस असल्यामुळे या नुकसानासाठी सदर निकष लागूच होत नाही. ते पुढे म्हणाले, ज्या शेतकºयांनी संबंधित पिकाचा विमा काढला आहे, त्यांना पिक विम्याची व एनडीआरएफची मदत अशी दोन्ही मिळणार आहे. ज्यांनी विमा काढला नाही, त्यांना राष्ट्रीय आपत्ती निवारण प्रबंधनाकडून मिळणारी मदत मिळेल. त्यामुळे कुणीही मदतीपासून वंचित राहणार नाही.
नुकसान झालेल्या शेतकºयांना परिपूर्ण आर्थिक मदत देण्यात येईल. विमा कंपनी व प्रशासनाने सहकार्याने पंचनामे पूर्ण करून शेतकºयांना मदत मिळण्याची कार्यवाही पूर्ण करावी. विमा न काढलेल्या पिकांचेही पंचनामे पूर्ण करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सिंदखेड राजा तालुक्यातील कोहळ येथील रवी बाबुराव गायकवाड (३३) व नारायण संतोष गायकवाड (३१) हे दोन व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. त्यांचे शोधकार्य सुरू आहे. त्यांच्या कुटंबीयांना तातडीने मदत देण्यात यावी. पावसाने पडझड झालेल्या घरांचा सर्वे पूर्ण करून तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा सुचनाही कुटे यांनी दिल्या.