बुलडाणा जिल्ह्यात सिंचनासाठीच्या पाण्याचे नियोजन करण्याचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 10:02 AM2017-12-01T10:02:16+5:302017-12-01T10:04:21+5:30
बुलडाणा जिल्ह्यात खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा मोठा आहे. त्यामधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेतकर्यांची पिके सुखणार नाही, याबाबत काळजी घेऊन त्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना कृषीमंत्री तथापालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी येथे दिल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : पाऊस समाधानकारक जरी पडला असला तरी प्रकल्पात अपेक्षीत जलसाठा नाही. त्यामुळे भविष्यात पाणी टंचाईचे सावट जिल्ह्यात येणार आहे. या संकटाचा सामना करण्यासठी आतापासून पर्यायी व्यवस्था आवश्यक आहे. खडकपूर्णा प्रकल्पाचा मृतसाठा मोठा आहे. त्यामधून प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात शेतकर्यांची पिके सुखणार नाही, याबाबत काळजी घेऊन त्या पद्धतीने पाणी देण्याचे नियोजन करावे, अशा सुचना कृषीमंत्री तथा पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी गुरूवारी येथे दिल्या.
पाणी आरक्षण समितीच्या बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. खा. प्रतापराव जाधव, आ. डॉ. शशिकांत खेडेकर, राहूल बोंद्रे, जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्यासह अन्य उपस्थित होते. खडकपूर्णा प्रकलपातील मृत साठ्यातील पाणी उपयोगात आणल्यास पाणीपुरवठा योजनांवर परिणामाबाबत चाचपणी करावी. तसेच एक पाळी पाणी सिंचनासाठी देता येत असल्यास तत्काळ आठ दिवसात उपसा सिंचनाद्वारे पाणी सोडावे, असे कृषीमंत्री म्हणाले. खासदार प्रतापराव जाधव, आमदार राहूल बोंद्रे व शशिकांत खेडेकर यांनी खडकपूर्णा प्रकलपातील होत असलेली पाण्याची चोरी, वीज जोडण्या तोडणे, शेतीला सिंचनासाठी उपसा सिंचनाद्वारे पाणी देण्याविषयी मत मांडले.