बैलांना विम्याचे कवच; शेतकरी अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2018 05:57 PM2018-09-08T17:57:27+5:302018-09-08T18:00:05+5:30
बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे.
- ब्रम्हानंद जाधव
बुलडाणा: पशुपालकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी पशुसंवर्धन विभागाकडून पशुधनाचा विमा उतरविण्यात येतो; त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला सुमारे पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिलेले आहे. पोळा सणाच्या पूर्वसंधेला माहिती घेतली असता या योजनेपासून शेतकरी अनभिज्ञ असल्याने बैलांना विम्याचे कवच नावालाच राहत असल्याचे चित्र दिसून आले.
शेतकºयांजवळ असलेली गाय, बैल, म्हैस, देशी व संकरीत दुभती जनावरे, शेळी, मेंढी व इतर पशुधन आकस्मिक तसेच नैसर्गीक संकटाने दगावण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. पशुधन दगावल्यास शेतकºयांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शासनाने राष्ट्रीय पशुधन विमा योजना सुरू केली आहे. ही योजना न्यू इंंडिया इन्शुरन्स कंपनी व शासन यांनी सामंजस्य करार करून दारिद्र्य रेषेखालील, बीपीएल, अनुसूचित जाती, जमाती व इतर प्रवर्गातील शेतकºयांना अतिशक कमी दरात पशुंची संख्या व प्रवर्गानुसार रक्कम ठरवून दिल्याने पशुपालकांसाठी ही योजना लाभदायी आहे. २०१६ मध्ये या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याला पाच हजार जनावरांचा विमा उतरविण्याचे लक्ष दिले आहे. २०१७-१८ मध्ये पशुधन विमा योजनेसाठी केंद्र शासनाकडून दोन कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा मिळून तीन कोटी १३ हजार रुपये निधी पशुधन विकास महामंडळाकडे उपलब्ध करून दिला होता. एक व तीन वर्षाचा पशुधनाचा हा विमा उतरविण्यासाठी पशुपालकांची मात्र उदासिनता दिसून येते. पोळा सणाच्या पूर्वसंधेला काही शेतकºयांना पशुधन विमा योजनेविषयी विचारणा केली असता बोटावर मोजण्या इतक्याच शेतकºयांना या विम्याविषयी माहिती असल्याचे दिसून आले. पशुधन विमा योजनेची जनजागृती नसल्याचे चित्र समोर आले आहे.