आंतरजिल्हा महिला फुटबॉल स्पर्धा: बुलडाण्याचा सोमवारी तगड्या कोल्हापूरशी सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 06:10 PM2020-02-23T18:10:51+5:302020-02-23T18:11:04+5:30
शनिवारी बुलडाणा संघाने अनुभवी व तगड्या ठाणे जिल्ह्याचा ४-३ अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली होती.
बुलडाणा: जळगाव जिल्हा फुटबॉल असोसिएशनच्यावतीने जळगाव खान्देश येथे अयोजित करण्यात आलेल्या आंतर जिल्हा महिला फुटबॉल स्पर्धेत बुलडाण्याचा उपात्यंफेरीत आज बलाढ्य कोल्हापूर संघाशी सामना होत आहे. शनिवारी बुलडाणा संघाने अनुभवी व तगड्या ठाणे जिल्ह्याचा ४-३ अशा गोलफरकाने पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली होती.
रविवार हा विश्रांतीचा दिवस असल्याने सोमवारी तगड्या कोल्हापूर संघाशी भिडण्याची मानसिक तयारी व विश्रांतीघेवून ताजेतवाने होण्यावर बुलडाण्याच्या महिला संघाचा भर राहला आहे. त्यामुळे सोमवारी दुपारी उपांत्य सामन्यात एका नव्या दमाने उतरण्यासाठी बुलडाण्याचा संघ तयार होत आहे. वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्यातून २० फेब्रुवारी पासून जळगाव खान्देश येथे या स्पर्धा होत आहे. या स्पर्धेत बुलडाणा संघाने पहिल्या सामन्यापासूनच आक्रमकता आणि संरक्षण दोन्ही पातळ््यावर आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. त्याच्या जोरावरच पहिल्या सामन्यात पालघरचा (मुंबई) ३-० अशा गोलफरकाने धुव्वा उडवला. उपउपांत्य सामन्यात श्निवारी ठाणे जिल्ह्याचा ४-३ अशा गोल फरकाने पराभव करत स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात प्रवेश केला आहे. ठाणे संघाविरुद्ध खेळताना तंत्र, शारीरिक तंदुरुस्तीच्या जोरावर दीपशिखा हिवाळे आणि पूर्वा बोराळकर या दोघींनी प्रत्येकी दोन गोल करत ठाणे संघाला पराभूत केले. त्यामुळे आता सोमवारी कोल्हापूर संघाशी होणाºया सामन्यात या दोघींच्या कामगिरीसोबतच गोल रक्षक खेळाडूच्या कामगिरीकडे बुलडाण्याचे लक्ष लागून आहे.
दरम्यान, शनिवारी झालेल्या एका सामन्यात कोल्हापूरच्या तगड्या संघाने भंडारा जिल्हा संघावर एकतर्फी विजय मिळविला. कोल्हापूरच्या प्रतीक्षा मिठारीने स्पर्धेत सात गोल करत हा सामनाच एकतर्फी करून टाकला होता. मृणाल खोत आणि ज्योती ढेरे यांनीही प्रत्येकी एक गोल करत तिला चांगली साथ दिली होती. त्यामुळे या संघाविरोधात खेळताना बुलडाणा संघाला संरक्षणावर भर द्यावा लागणार आहे.
प्रतीक्षा मिठारीला रोखण्याचे आव्हान
बुलडाणा जिल्ह्याचा महिला फुटबॉल संघ तसा संतुलीत आहे. पण कोल्हापूरच्या प्रतीक्षा मिठारीने उपउपांत्य सामन्यात भंडारा संघाच जेरीत आणत सात गोल केले होते. त्यामुळे स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी बुलडाणा जिल्हा संघाला प्रतीक्षाला रोखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. त्यात बुलडाणा संघ यशस्वी झाला तर ज्योती ढेरे आणि मृणाल खोतचेही आव्हान राहणार आहेच. त्यामुळे केवळ डिफेन्सीव्ह भूमिका न घेता कोल्हापूर विरोधात आक्रमक खेळ केल्यास बुलडाणा संघाला स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्याची संधी आहे.