अर्ध्या शैक्षणिक सत्रातच शिक्षकांच्या बदल्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:12 PM2017-09-04T20:12:19+5:302017-09-04T22:26:51+5:30
बुलडाणा जिल्ह्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक सत्राच्या मध्यातच बदल्या होणार असून, त्यासाठी संवर्ग एक व दोनमध्ये बसणाºया शिक्षकांनी सोईच्या बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सुद्धा केले आहेत. शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीत करण्याऐवजी शैक्षणिक सत्राच्या मध्येच बदल्यांचा गोंधळ आल्याने अभ्यासक्रमाचे सत्र मात्र मागे पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जिल्ह्यातील शिक्षकांच्या शैक्षणिक सत्राच्या मध्यातच बदल्या होणार असून, त्यासाठी संवर्ग एक व दोनमध्ये बसणाºया शिक्षकांनी सोईच्या बदलीसाठी आॅनलाईन अर्ज सुद्धा केले आहेत. शिक्षकांच्या बदल्या उन्हाळी सुट्टीत करण्याऐवजी शैक्षणिक सत्राच्या मध्येच बदल्यांचा गोंधळ आल्याने अभ्यासक्रमाचे सत्र मात्र मागे पडत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
शिक्षकांची संख्या व शिक्षकांच्या अडी-अडचणी विचारात घेऊन शासनाने शिक्षकांसाठी जिल्ह्यांतर्गत बदल्याचे नवे सुधारित धोरण फेब्रुवारी २०१७ मध्ये जाहीर केले होते. या नव्या धोरणानुसार अवघड क्षेत्र व सर्वसाधारण क्षेत्र अशा दोन क्षेत्रांत जिल्ह्यांतील शाळांची वर्गवारी करण्यात आली. जे गाव, शाळा तालुका मुख्यालयापासून दूर आहे. दळणवळणाच्या दृष्टीने त्या शाळेत अथवा गावात पोचण्यास सोयी-सुविधा नाहीत. दुर्गम व डोंगराळ भागातील गावे तसेच काम करण्यास प्रतिकूल परिस्थिती असलेली गावे अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात आली. तर अवघड क्षेत्रात न मोडणारी गावे, शाळा सर्वसाधारण क्षेत्रात ओळखली जाते. संवर्ग एक व संवर्ग दोनमध्ये येणाºया शिक्षकांसाठी बदलीप्रक्रिया सुरू करण्यात आली असून, या बदली प्रक्रियेमध्ये जिल्हा परिषद शाळांत काम करणारे प्राथमिक, माध्यमिक, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख यांचा समावेश आहे. ज्या शिक्षकांची सेवा अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण झाली आहे, असे शिक्षकच बदली अधिकारास प्राप्त असून सर्वसाधारण क्षेत्रात ज्या शिक्षकांची सेवा दहा वर्षे पूर्ण झाली असेल, असे शिक्षक बदलीस पात्र आहेत. आजारी शिक्षक, पती-पत्नी एकत्रीकरण, अवघड-सोपे क्षेत्र यानुसार शिक्षकांकडून त्यांच्या सोईच्या ठिकाणी बदलीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील संवर्ग एक व संवर्ग दोनमधील शिक्षकांनी आॅनलाईन अर्ज केले आहेत. शिक्षकांच्या या बदलीची प्रक्रिया उन्हाळी सुट्टीत आटोपण्याऐवजी शैक्षणिक सत्राच्या मध्येच राबविण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रमही मागे पडत आहे. महिन्याभरापासून सुरू असलेल्या बदलीच्या या गोंधळामुळे बदलीसाठी आॅनलाईन अर्ज केलेल्या शिक्षकांचेही शिक्षविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम जाणवत आहे.
असे आहेत शिक्षकांचे संवर्ग
* संवर्ग एक - अपंग, विधवा, परितक्ता.
* संवर्ग दोन - ३० कि़मी. अंतरावरील पती-पत्नी
* संवर्ग तीन - अवघड क्षेत्रातील शिक्षक
* संवर्ग चार - एकल शिक्षक
सवंर्ग तीन व चारच्याही होणार बदल्या
शैक्षणिक सत्र २९१७-१८ मध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये येणाºया शिक्षकांकडून बदलीसाठी आॅनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार संवर्ग एक व दोनच्या शिक्षकांची बदली प्रक्रिया शेवटच्या टप्प्यात आहे. आता संवर्ग तीनमध्ये येणारे अवघड क्षेत्रातील शिक्षक व उर्वरीत संवर्ग चार मध्ये येणाºया शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू होणार असून त्यासाठी आॅनलाईन अर्ज प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
संवर्ग एक व संवर्ग दोनच्या शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी आॅनलाईन अर्ज शिक्षकांनी केलेले आहेत. नविन धोरणानुसार ही बदली प्रक्रिया पार पडत असून यामध्ये विद्यार्थ्यांचे कुठल्याही प्रकारे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतल्या जाते.
- एन. के. देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, बुलडाणा.
शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक सत्र सुरू असताना करण्यात येत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. शिक्षकांच्या बदल्या शैक्षणिक सत्र संपल्यानंतर म्हणजे उन्हाळी सुट्टीतच करण्यात याव्या.
- विजय धोंडगे, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती, जि.प.शाळा, ब्रह्मपुरी.