सभापती,सचिवाविरुद्ध दखलपात्र गुन्हा
By admin | Published: October 22, 2016 02:31 AM2016-10-22T02:31:41+5:302016-10-22T02:31:41+5:30
शिपाई महिलेने दिली खामगाव पो.स्टे.ला तक्रार.
खामगाव, दि. २१- स्थानिक कृउबासच्या स्वीकृत सदस्य निवडवरुन झालेल्या वादातून तालुका उपनिबंधक कार्यालयाचे डाकबुक व पत्र गायब केल्याची तक्रार सहायक निबंधक कार्यालयातील शिपाई महिलेने शुक्रवारी शहर पोलीस स्टेशनला दिली. या तक्रारीवरुन पोलिसांनी स्थानिक बाजार समितीच्या सभापती व सचिवाविरुद्ध शुक्रवारी कलम ३५३ अन्वये दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
येथील कृउबासमधील संचालक गजानन ढोरे व लताताई वरखेडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त पदावर स्वीकृत संचालकांची निवडसाठी बुधवारी कृउबासमध्ये सभेचे आयोजन केले होते. दरम्यान स्वीकृत संचालकांचे निवडच्या विषयाला स्थगनादेशचे पत्र घेऊन तालुका उपनिबंधक कार्यालयातील शिपाई मुन्नीबाई धांडेकर कृउबासमध्ये गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी पत्राची पोच व डाकबुक न देता अडवणूक झाल्याची तक्रार सहायक उपनिबंधक कृपलानी यांच्याकडे केली. या तक्रारीवरुन उपनिबंधक महेश कृपलानी यांनी बुधवारी शहर पोलिस स्टेशनला कार्यालयीन डाकबुक व पत्र गायब केल्याची तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी कृउबास सभापती संतोष टाले व सचिव दिलीप देशमुख यांच्या विरुद्ध बुधवारी कलम १८६, १८३ भादंविनुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती. दरम्यान शुक्रवारी शिपाई महिलेने याच प्रकारची तक्रार शुक्रवारी दिली. त्यावरुन पोलिसांनी कलम ३५३, १८६, ३४ भादंविनुसार दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.