बुलडाण्यात उभारणार आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:36 AM2021-09-03T04:36:22+5:302021-09-03T04:36:22+5:30
हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे २९ ऑगस्ट ...
हॉकीचे जादूगार स्व. मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय क्रीडा दिन कार्यक्रमाचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल बुलडाणा येथे २९ ऑगस्ट रोजी करण्यात आले. त्यावेळी ते बालत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती, तहसीलदार रूपेश खंडारे, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश जाधव आदी उपस्थित होते. बुलडाणा शहरात भविष्यात आंतरराष्ट्रीय आर्चरी रेंज, तालुका क्रीडा संकुलाची उभारणी, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, कुस्ती हॉल, मॅट्स, कव्हर, मल्टीपर्पज हॉल, वातानुकूलित हॉल, संकुलामध्ये येण्यासाठी चांगला रस्ता निर्माण करण्यात येईल, असेही यावेळी आ. संजय गायकवाड यांनी सांगितले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी, कोणताही एक खेळ निश्चित करून त्या खेळासाठी तन, मन व धनाने खेळाडूंनी प्रयत्न करावे. निश्चित केलेल्या खेळामध्ये करिअर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन केले. जिल्हा युवा पुरस्कारार्थी प्रतीक जोहरी व संस्थेमध्ये कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन, बुलडाणा यांना प्रशस्तिपत्र, गौरवचिन्ह तथा बक्षिसाचा धनादेश देण्यात आला. संचलन राज्य क्रीडा मार्गदर्शक अनिल इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन क्रीडा अधिकारी रवींद्र धारपवार यांनी मानले.
.
यांचा झाला गौरव
नुकत्याच पोलंड येथे झालेल्या जागतिक कनिष्ठ युवा चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक प्राप्त खेळाडू मिहीर नितीन अपार व सहभागी खेळाडू प्रथमेश समाधान जवकार, मार्गदर्शक चंद्रकांत इलग यांचा सत्कार करण्यात आला. जिल्ह्यातील विविध क्रीडा स्पर्धा तथा एकविध क्रीडा संघटनेच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभाग तथा प्रावीण्य प्राप्त केलल्या खेळाडूंना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये पवन पातोडे, साक्षी हिवाळे, वैष्णवी पवार, भूषण सिरसाट, सुहास राऊत, शिवम भोसले, वैभव सोनोने, पंकज शेळके, प्रसाद रनाळकर, प्रेम बावस्कर, चेतन गवळी, ऋषिकेश जांभळे, सागर उबाळे, गौरी राठोड आदींचा समावेश आहे. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या नवमहाराष्ट्र अभियानअंतर्गत युवा सामाजिक पुरस्कार म्हणून डॉ. गायत्री सावजी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.