आंतरराष्ट्रीय योग दिवस ऑनलाइन साजरा हाेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:23 AM2021-06-20T04:23:58+5:302021-06-20T04:23:58+5:30
बुलडाणा : संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. ...
बुलडाणा : संयुक्त राष्ट्र संघटनेने २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे निश्चित केले आहे. त्या अनुषंगाने जिल्हाभरात विविध संघटनांच्या वतीने ऑनलाइन साजरा करण्यात येणार आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात वाढलेला ताणतणाव, शरीर स्वास्थ व मन:शांतीसाठी नियमित योगाभ्यासाची गरज आहे. या कार्यक्रमात सहभागी हाेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांनी केले आहे.
कोरोना १९च्या प्रादुर्भावामुळे जागतिक महामारीवर मात करून, अनेक रोगांना प्रतिबंध करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, प्रत्येक व्यक्तीने दररोज योग, प्राणायाम करावा, योगाभ्यासाच्या माध्यमातून शिक्षित, सुसंस्कृत व स्वास्थ नागरिक, युवक घडविण्यास, तसेच योगाचा प्रचार व प्रसार होण्यास मदत होणार आहे. जिल्हा प्रशासन, शालेय शिक्षण विभाग, क्रीडा व युवक सेवा संचालनालय, म.रा., पुणेअंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलडाणा, शिक्षणाधिकारी माध्य./प्राथ. कार्यालय, आयुष मंत्रालय, बुलडाणा जिल्हा योग संघटना, आरोग्य भारती, क्रीडा भारती, आर्ट ऑफ लिव्हिंग, योग विद्याधाम नाशिक, योगांजली योगवर्ग, पतंजली योग समिती, नेहरू युवा केंद्र विविध क्रीडा मंडळे, महिला मंडळ, विविध एकविध खेळ संघटना, बुलडाणा जिल्हा शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, आयुर्वेद महाविद्यालय, नर्सिंग महाविद्यालय व योगक्षेत्रात विविध कार्यरत संस्था, इ.च्या संयुक्त विद्यमाने २१ जून आंतरराष्ट्रीय योग दिनाचे ऑनलाइन पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने बुलडाणा जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक संस्था, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, महिला मंडळे, क्रीडा मंडळे, एन.सी.सी., एन.एस.एस., भारत स्काउट गाइड व इतर सर्व आस्थापनांनी आपल्या अधिनस्त असलेले सर्व अधिकारी, कर्मचारी या सर्वांनी ऑनलाइन योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी हाेणार आहेत.
लाेकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांची ऑनलाइन उपस्थिती
या ऑनलाइन आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात बुलडाणा जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, पालकमंत्री, खासदार, जि.प. अध्यक्षा, आमदार, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, जि.प. उपाध्यक्षा, मुख्याधिकारी नगरपरिषद हे या कार्यक्रमात ऑनलाइन उपस्थित राहून शुभेच्छा प्रदान करणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी बुलडाणा एस.रामामूर्ती व जिल्हा क्रीडा अधिकारी बुलडाणा संजय सबनीस, शिक्षणाधिकारी (माध्यमिक/प्राथमिक) सचिन जगताप, तसेच आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.