आधुनिक काळातही विधवा, निराधार महिला उपेक्षीत!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2019 01:24 PM2019-04-21T13:24:45+5:302019-04-21T13:29:00+5:30
विधवा आणि परितक्त्या महिलांना महिला प्रगती केंद्राचा मोठा आधार होत आहे. नांदुरा तालुक्यातील मेळावा यशस्वी झाला - रेखा पोफळकर
अनिल गवई
विधवा, परितक्ता आणि निराधार महिला या समाजातील एक घटक आहेत. मात्र, पतीच्या निधनानंतर अनेक विधवांना उपेक्षीत भावनेने पाहले जाते. तर निराधारांना मदतीच्या दृष्टीकोनातून अपेक्षीत प्रतिसाद मिळत नाही. या गोष्टीचा अनुभव घेतल्यानंतर या महिलांसाठी आयुष्य झोकून देणाऱ्या महिला प्रगती केंद्राच्या रेखा पोफळकर यांच्याशी साधलेला संवाद...
विधवा, निराधार आणि परितक्ता महिलांसाठी सेवा कार्याची सुरुवात कशी झाली?
- पतीच्या निधनानंतर विधवा महिलांचे आयुष्य काय असते. त्यांना कशा प्रकारची अवहेलना सहन करावी लागते. त्यांच्या नशिबी येत असलेल्या संघर्षाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला आहे. त्यानंतर विधवा, निराधार आणि परितक्ता महिलांसाठी काहीतरी करण्याच्या उद्देशाने महिला प्रगती केंद्राची स्थापना केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून या केंद्राच्या वतीने महिलांच्या उत्थानासाठी झटत आहे.
महिला प्रगती केंद्राच्या माध्यमातून महिलांच्या कोणत्या समस्या सोडविल्या जातात?
- समाजातील विधवा, परितक्ता आणि निराधार महिलांना कायदेविषयक मार्गदर्शनासोबतच त्यांचे समुपदेशन केले जाते. तसेच या सोबतच त्यांना रोजगाराभिमुख मार्गदर्शनासाठी महिला प्रगती केंद्राचा पुढाकार आहे. बुलडाणा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात महिलांच्या समुपदेशनासाठी मेळावे तसेच कॉर्नर बैठका सातत्याने घेतल्या जात असतात.
महिला प्रगती केंद्राच्या धोरणाचा आतापर्यंत किती महिलांना लाभ झाला आहे?
- महिला प्रगती केंद्राच्या माध्यमातून सामाजिक कार्याला जेमतेम दीड वर्षाचा कालावधी पूर्ण होत आहे. या कालावधीत मेळावे, प्रबोधन मेळावे घेण्यात आले. या माध्यमातून जिल्ह्यातील दीडशेहून अधिक महिलांना आधार दिला आहे. त्यांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यात आले.
बुलडाणा जिल्ह्यात महिला प्रगती केंद्राची प्रत्यक्षात प्रत्यक्षात काय स्थिती आहे?
- विधवा आणि निराधारांना मदतीचा हात देण्यासाठी महिला प्रगती केंद्राचा पुढाकार आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये मेळावे घेत, महिलांचे समुपदेशन करण्यात येत आहे. बुलडाणा, खामगाव, नांदुरा येथे महिला प्रगती केंद्रांचे कार्यालय उघडण्यात आले आहे. १४० महिलांना रोजगाराचे दरवाजे देखील खुले करण्यात आले आहे. महिलांच्या उत्थानासाठी समाजाने सकारात्मक भावनेने मदत करावी.
विधवा आणि परितक्त्या महिलांना महिला प्रगती केंद्राचा मोठा आधार होत आहे. नांदुरा तालुक्यातील मेळावा यशस्वी झाला
- रेखा पोफळकर