दारूच्या नशेत मुलावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला; भाेसा येथील घटना, आराेपी बाप फरार
By संदीप वानखेडे | Published: March 17, 2024 07:10 PM2024-03-17T19:10:30+5:302024-03-17T19:11:42+5:30
भोसा गावातील विठ्ठल पांडुरंग गाढवे याने पोटचा मुलगा कैलास गाढवे याच्याशी दारूच्या व्यसनापायी वाद घातला.
मेहकर: दारूच्या नशेत झालेल्या वादातून पाेटच्या मुलावर बापाने कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना मेहकर तालुक्यातील भाेसा येथे रविवारी दुपारी घडली. यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कैलास विठ्ठल गाढवे (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे तसेच आराेपी विठ्ठल पांडुरंग गाढवे हा पसार झाला आहे.
भोसा गावातील विठ्ठल पांडुरंग गाढवे याने पोटचा मुलगा कैलास गाढवे याच्याशी दारूच्या व्यसनापायी वाद घातला. या वादातूनच विठ्ठल गाढवेने कैलास गाढवे याच्यावर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. कैलासच्या मानेवर, पाठीवर, गालावर, ताेंडावर सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या कैलास गाढवे यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत. वडील मुलावर कुऱ्हाडीने वार करीत असताना जमा झालेल्यांपैकी कुणीही मदतीसाठी धावले नाही. कैलास गाढवे हा आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. त्याला एक साडेचार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांची मुलगी व पत्नी आहे. हल्ला केल्यानंतर विठ्ठल गाढवे फरार झालेला असून, बातमी लिहीपर्यंत डोणगाव पोलिस स्टेशनला कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.
भाेसा परिसरात वाढले अवैध धंदे
भाेसा परिसरात गत काही दिवसांपासून अवैध धंदे वाढले आहे. गावठी दारूची खुलेआम विक्री हाेत आहे तसेच वरली मटका व इतर अवैध धंदे माेठ्या प्रमाणात सुरू असल्याने व्यसनाधीनता वाढली आहे. याकडे डाेणगाव पाेलिसांचे दुर्लक्ष हाेत असल्याचे चित्र आहे. अवैध धंदे वाढल्याने अशा प्रकारच्या गंभीर घटना घडत असल्याचे चित्र आहे.