मातृतीर्थात कार्डियाक रुग्णवाहिका रुग्ण सेवेत रुजू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2021 04:34 AM2021-04-16T04:34:57+5:302021-04-16T04:34:57+5:30
देऊळगाव राजा : मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिका १४ एप्रिलपासून ...
देऊळगाव राजा : मातृतीर्थ मतदारसंघातील देऊळगाव राजा व सिंदखेड राजा ग्रामीण रुग्णालयासाठी अत्याधुनिक अशा दोन कार्डियाक रुग्णवाहिका १४ एप्रिलपासून रुग्णसेवेत रुजू झाल्या़ पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते ६४ लाख रुपये किमतीच्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले़
ग्रामीण रुग्णालयात एकच रुग्णवाहिका असल्याने रुग्णांची गैरसोय होत होती़ शिवाय गंभीर परिस्थितीत रुग्णांना ऑक्सिजन सुविधा असलेल्या अत्याधुनिक ॲम्ब्युलन्सची गरज असल्याने देऊळगाव राजा व सिंदखेडराजा ग्रामीण रुग्णालयासाठी सर्व सुविधायुक्त कार्डियाक ॲम्ब्युलन्स उपलब्ध करू असे आश्वासन जानेवारी महिन्यात पालकमंत्री डॉ़ राजेंद्र शिंगणे यांनी दिले होते़ स्थानिक ग्रामीण रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा असलेल्या २ कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या हस्ते करण्यात आले़ यावेळी जिल्हा परिषद सभापती रियाजखा पठाण, जि. प़ सदस्य मनोज कायंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष गंगाधर जाधव , पंचायत समितीच्या सभापती रेणुका बुरकुल , राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष गजानन पवार ,तालुकाध्यक्ष राजू शिरसाठ, ,गणेश बुरकूल, गजेंद्र शिंगणे यांची प्रमुख उपस्थिती होती़ कोरोना काळात रुग्णांसाठी सुविधांची कमतरता पडू देणार नाही अत्याधुनिक सर्व सुविधायुक्त कार्डियाक ॲम्ब्युलन्स रुग्णसेवेसाठी उपयुक्त असून गरजू रुग्णांना याचा लाभ देण्याचे निर्देश पालकमंत्री डॉ. शिंगणे यांनी याप्रसंगी बोलताना दिले़ अत्याधुनिक रुग्णवाहिका नसल्याने ऐनवेळी आपत्कालीन स्थितीत रुग्णांची गैरसोय होत असल्याने स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत आमदार निधीतून ६४ लाख रुपयांच्या ॲम्ब्युलन्स खरेदी करण्यात आल्या़ या ॲम्ब्युलन्सच्या लोकार्पण प्रसंगी ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अस्मा शाहीन,डॉ. मंगेश वायाळ,प्रदीप वाघ,,गजानन काकड यांच्यासह ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते़