पीक विम्याच्या चुकीच्या याद्या सादर

By admin | Published: May 12, 2017 08:00 AM2017-05-12T08:00:26+5:302017-05-12T08:00:26+5:30

लोणार तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार : पैशाअभावी पेरणी जाणार लांबणीवर

Introducing wrong lists of crop insurance | पीक विम्याच्या चुकीच्या याद्या सादर

पीक विम्याच्या चुकीच्या याद्या सादर

Next

किशोर मापारी
लोणार : सन २०१६ - १७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या लोणार तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर केल्या आहेत. यामुळे ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.
सतत चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सन २०१६-२०१७ साली ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. अशा शेतकऱ्यांनासुद्धा शासन स्तरावरून पेरणीसाठी मदत व्हावी, या प्रमुख उद्देशाने लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. लोणार तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांच्या याद्या भारतीय स्टेट बँकेत सादर केल्या .
सदर याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर चुकीचे खाते नंबर, अर्धवट खाते नंबर अशा त्रुटी असल्यामुळे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक अनुदानाची रक्कम टाकू शकले नाहीत.
पीक विम्याच्या अनुदानाची रक्कम खात्यात का जमा झाली नाही, याबाबतचा जाब शेतकरी लोणार तहसील कार्यालयाच्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना विचारू लागले असता, बँकेत याद्या दिल्या आहेत; परंतु बँकेने अजून खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली नाही. बँक व तहसील कार्यालय यांच्या चकरा मारून त्रस्त झाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला. तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक अशोक गवई यांची भेट घेतली असता, सदर याद्यांमध्ये अनेक प्रकारच्या चुका असल्याचे शाखा व्यवस्थापक अशोक गवई यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली, त्यामुळे आल्या पावली तहसीलदारांना परत फिरावे लागले.
महसूल विभागाच्या हलगर्जीमुळे पीक विमा अनुदानाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत. यामुळे पेरणी लांबणीवर पडून होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे.

ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर खाते नंबर अचूक असेल त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करायला हवी. ज्यांचे खाते नंबर आणि नावे चुकलेले असतील, अशी नावे बाजूला ठेवायला हवीत. त्यामध्ये दुरुस्ती करून देण्यास तयार आहोत.
- सुरेश कव्हळे,  तहसीलदार,
तहसील कार्यालय, लोणार.

पीक विमा अनुदानाच्या याद्या महसूल विभागाने सादर केल्या; परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे खात्यात रक्कम जमा करता आली नाही. याद्या दुरुस्तीबाबत तहसीलदारांना सांगण्यात आले आहे. याद्या दुरुस्ती होताच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.
- अशोक गवई,  शाखा व्यवस्थापक,
भारतीय स्टेट बँक,शाखा लोणार.

Web Title: Introducing wrong lists of crop insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.