सिंदखेडराजात साकारतेय अद्यावत संग्रहालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 04:18 PM2019-05-18T16:18:16+5:302019-05-18T16:18:44+5:30
सिंदखेडराजा : जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अद्यावत संग्रहालय साकार होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा येथे जिल्ह्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारे अद्यावत संग्रहालय साकार होत आहे. संग्रहालयाला अनुसरून असलेली संग्रहालयाची नवीन इमारत याठिकाणी २०१८ मध्ये बांधुन पुर्ण झाली आहे. ही इमारत सार्वजनिक बांधकाम विभाग बुलडाणा यांनी बांधली आहे.
या बांधकामावर ३.३७ कोटी रुपये खर्च आला असून, संग्रहालयाच्या नवीन इमारतीमध्ये प्रदर्शनाचे चार प्रशस्त दालने असल्याची माहिती १८ मे रोजी असलेल्या जागतिक संग्रहालय दिनाच्या पूर्वसंध्येला समोर आली.
यामध्ये प्रथम दालनात सिंदखेडराजा व जिल्ह्यात असलेल्या पाषाण मुर्त्या व इतर पाषाण कलाकृतींचे दर्शन राहणार आहे. दुसऱ्या दालनात शस्त्र तोफा इत्यादीचे प्रदर्शन राहणार आहे. सोबतच या शस्त्रांची मराठी व इंग्रजीमध्ये माहितीसुध्दा लिहीली जाणार आहे. तिसºया प्रदर्शन दालनात माँ साहेब जिजाऊ यांच्या जिवनातील महत्वपुर्ण घटनांशी संबंधित चित्रकलाकृतीचे प्रदर्शन राहणार आहे. चौथ्या दालनात कलावस्तु ऐतिहासिक नाणे, ऐतिहासिक अभिलेख आदी वस्तु राहणार आहे. संग्रहालय इमारतीमध्ये मिनीथीएटरची व्यवस्था केली असून या थिएटरव्दारा छत्रपती शिवाजी महाराज, सिंदखेडकर जाधव यांच्या इतिहासावर लहान लहान क्लीप्स प्रेक्षकांना दाखवण्यात येईल. याशिवाय विविध ऐतिहासिक माहिती उपलब्ध राहणार आहे. संग्रहालय इमारतीमध्ये ग्रंथालय व वाचन कक्ष इत्यादीची व्यवस्था करण्यात आली आहे. इतिहास संशोधक, विद्यार्थी या ग्रंथालयाचा लाभ घेऊ शकतील.
ऐतिहासिक पुस्तके, कलावस्तुंच्या प्रतिकृती, पारंपारिक कलावस्तु आदी साहित्य या ठिकाणी प्रेक्षकांसाठी विक्रीला उपलब्ध असेल. दुरून येणारा प्रेक्षक संग्रहालय पाहून झाल्यावर त्याला थोडी विश्रांती मिळावी याची व्यवस्था राहणार आहे.
प्रदर्शनाचा साडेतीन कोटींचा प्रस्ताव
संग्रहालयाच्या पायºया चढण्यास जेष्ठ नागरिकांना त्रास होऊ नये, दिव्यांगांना सुलभ जाणेयेणे व्हावे याकरीता त्यांच्या सेवेला संग्रहालय इमारतीत लिफ्टची सुविधा केली आहे. तसेच व्हीलचेअर सुध्दा उपलब्ध राहणार आहे. याशिवाय प्रेक्षकांसाठी सौंदर्यप्रसाधनगृह, पिण्याचे पाणी बाहेर परिसरात अल्पविश्रांती घेण्यास लॉन या सुविधा सुध्दा संग्रहालय परिसरात करण्यात येणार आहे.
४सिंदखेडराजा येथील संग्रहालय जनतेसाठी लवकर सुरू व्हावे याकरीता प्रदर्शन व्यवस्थेचा ३ कोटी ५७ लाखाचा प्रस्ताव तयार करून तो पुरातत्व व वस्तुसंग्रहालये विभाग, मुंबई यांना सादर केला आहे. निधी मिळण्याचे अपेक्षित आहे. सिंदखेडराजा येथील शासकीय संग्रहालय हे इतिहास संशोधन, पर्यटन इत्यादीच्या दृष्टीने अत्यंत महत्वपुर्ण राहणार असून सिंदखेडराजा नगराचे ते भूषण राहील यात शंका नाही.