खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैर कारभाराची चौकशी करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2020 03:10 PM2020-01-28T15:10:35+5:302020-01-28T15:10:45+5:30
समयबद्ध कालावधीत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव शहर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील भ्रष्टाचाराच्या उद्देशाने केलेल्या गैर कारभार प्रकरणी जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्थेमार्फत महाराष्ट्र कृषी उत्पन्न नियम क्रमांक १०७ व १०८ या नियमांचे उल्लंघन झाले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीतील गैरकारभाराची ४०(ई) नियमातंर्गत समयबद्ध कालावधीत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खामगाव शहर काँग्रेस पक्षाकडून करण्यात आली. यासंदर्भात पालकमंत्र्यांना २५ जानेवारी निवेदन सादर करण्यात आले.
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सभापती संतोष ताले यांनी भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या साडेपाच लाख रुपये स्वत:च्या नावावर उचलून गैरप्रकार केला. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांनी सभापती ताले यांना नोटीस देत पैशांचा भरणा करण्यासाठी नोटीस बजावली. मात्र तरी देखील सभापती ताले यांनी अग्रिम रक्कमेची उचल कशासाठी केली. याचा कोणताही हिशोब व खर्चाचे व्हाऊचर अद्यापपर्यंत सादर केले नाही. महाराष्ट्र कृषी उत्पन्न नियमन नियम क्र.१०७ प्रमाणे सभापतींनी रक्कम आठवड्यातून दोनवेळा बँकेत टाकली पाहीजे. नियमाप्रमाणे अग्रीम रक्कम देण्याची कोणतीही तरतूद नाही. बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या मान्यतेशिवाय सभापतीला कोणताही खर्च करता येत नाही. दरम्यान, असे असतानाही सभापतींनी आपल्या पदाचा दुरूपयोग करीत अनधिकृतरित्या रोख स्वरूपात अॅडव्हास उचलला. नोटीस मिळाल्यानंतर देखील अद्यापपर्यंत सभापतींनी अग्रिम रक्कम बाजार समितीकडे जमा न केली नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमांचे उल्लघंन झाले. त्यामुळे ४० (ई) अंतर्गत सभापती संतोष ताले यांची चौकशी व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.
संतोष टाले यांनी काँग्रेससमधून गेल्या महिन्यातच भाजपात प्रवेश घेतला आहे.गेल्या काही दिवसांपासून कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती संतोष टाले यांच्याबाबतीत संचालक मंडळात मतभेद सुरू आहेत.
त्वरीत कारवाई करण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश!
खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भ्रष्टाचाराच्या उद्देशाने करण्यात आलेल्या गैरकारभाराची तात्काळ चौकशी करावी, असे निर्देश पालकमंत्री ना. राजेंद्र शिंगणे यांनी बुलडाणा जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधकांना दिले आहेत.