खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आयपीएलच्या जुगाराचे जाळे

By अनिल गवई | Published: April 24, 2023 05:38 PM2023-04-24T17:38:34+5:302023-04-24T17:41:21+5:30

पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची धडक कारवाई

ipl gambling ring in rural areas of khamgaon taluka | खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आयपीएलच्या जुगाराचे जाळे

खामगाव तालुक्यातील ग्रामीण भागात आयपीएलच्या जुगाराचे जाळे

googlenewsNext

अनिल गवई, लोकमत न्यूज नेटवर्क, खामगाव : जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील आयपीएल जुगाराच्या कारवाईची शाई वाळते ना वाळते तोच, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशन हद्दीतील आयपीएलच्या जुगारावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली. वडजी भेंडी येथील कारवाईत तिघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून सव्वालाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे खामगाव शहर आणि परिसरात आयपीएलच्या जुगाराचे जाळे विणले गेल्याचे चित्र आहे.

याबाबत पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीनुसार, पिंपळगाव राजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील वडजी भेंडी शेत शिवारातील एका शेतात रामसिंग विलास पवार ३२ रा. वडजी भेंडी, अजय किसनदास बौरागी २१ रा. घाटपुरी नाका खामगाव, अक्षय गणेश जुनारे २४ रा. गोपालनगर खामगाव हे तिघे आयपीएलच्या सामन्यावर जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उपरोक्त ठिकाणी छापा मारला असता तिन्ही आरोपी आयपीएल सामन्यावर ऑनलाइन जुगार खेळताना आढळून आले. आरोपींकडून २५ हजार रुपये किमतीचे सहा मोबाइल, ३५ हजार रुपये किमतीचा लॅपटाप, दुचाकी, पेन ड्राईव्ह आणि १५५० रुपये रोख रक्कमेसह १ लाख २२ हजार ३६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ अ अन्वये कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल जंजाळ यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली.

बुकींचे ग्रामीण भागात बस्तान

गत आठवड्यात जलंब पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारवाईनंतर रविवारी रात्री वडजी भेंडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई केली. या दोन्ही कारवाईत खामगाव शहरासह नांदुरा शहरातील आरोपींचा समावेश आहे. त्यामुळे खामगाव आणि नांदुरा शहरातील बुकींनी सुरक्षित ठिकाण म्हणून ग्रामीण भागात बस्तान बसविल्याची चर्चा आहे.

चक्री जुगार दुर्लक्षित

खामगाव तालुक्यातील पिंपळगाव राजा पोेलिस स्टेशनच्या हद्दीतील एका गावात दोन चक्री जुगार सुरू आहेत. या चक्री जुगाराकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नजीकच्या काळात एखादे वेळी कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो, अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: ipl gambling ring in rural areas of khamgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.