शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:55 PM2020-02-04T14:55:18+5:302020-02-04T14:55:34+5:30
पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
शेगाव : बाळापूर-शेगाव मार्गावर दोन्ही बाजुंनी नियमानुसार सुमारे सहा हजार ४० झाडे लावणे बंधनकारक असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक हजार ६०० झाडे लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे.
अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचेही माहिती अधिकारत प्राप्त माहितीवरून स्पष्ट होत आहे.
विदर्भ पंढरी शेगांव येथे येणाºया भाविक भक्तांच्या सोयीकरीता आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाºया बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव-बाळापुर रस्त्याची सुधारणा करणे, ५० कोटी रुपयांच्या १२ कि.मी.लांबीच्या शेगांव-बाळापुर या राज्य महामार्गाच्या कामास मात्री मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.संजय कुटे व तत्काळीन जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे यांच्या उपस्थितीत आठ जुलै २०१७ रोजी प्रारंभ झाला होता.
रस्त्याचे बांधकाम व रस्त्याचे दोन्ही बाजूने वृक्ष लावून सौंदर्यकरणं करण्याचे कंत्राट अकोला येथील ओबेरॉय कन्ट्रक्शन कंपनीला दण्यात आले होते. निवीदेनुसार १२ किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ६ हजार ४०० झाडे लावणे बंधनकारक असतांना संबंधीत कंत्राटदाराने फक्त १ हजार ६०० झाडेच लावली. सोबतच प्रत्येक रोपाची किंमत ५११ रुपयांची दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कथितस्तरावर हाताशी धरून लाखो रुयांचे देयक काढल्याचे या माहिती अधिकारात उघड झाले आहे.
खामगाव येथील निविदेनुसार शेगाव-बाळापूर रस्त्याच्या दोन्ही बाजुला ६,४०० झाडे नियमानुसार लावणे बंधनकारक होते.
परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव यांनी रेकॉर्ड बिलामध्ये ५,२५० झाडे लावल्याचे दर्शविले आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी १००० ते १६०० झाडे लावून १९ लाख २० हजार रुपयांचे देयक काढून शासनाची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहले आहे. (प्रतिनिधी)