आयुष इमारती बांधकामात तारतम्य नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 02:02 PM2020-03-14T14:02:07+5:302020-03-14T14:02:20+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर आयुष इमारत बांधकाम करण्यात येते. मात्र, या इमारत बांधकाम प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते. परिणामी, आयुष विभाग सुरू होण्यापूर्वीच या विभागाचे वाभाडे निघत आहेत.
शेगाव येथील सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आयुष इमारतीचे बांधकाम करण्यासंदर्भात उपसंचालक आरोग्य सेवा, राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी १५ फेब्रुवारी २०२० रोजी कार्यारंभ आदेश दिले आहेत. या कार्यारंभ आदेशावर राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक मंडळाचे कार्यकारी अभियंता अंकुश पाटील यांची स्वाक्षरी आहे. मात्र, यासंदर्भात उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाकडे या इमारतीचे बांधकाम सुरू असताना उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनाला कोणतीही खबरबात नाही. त्यामुळे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावरील आयुष इमारत बांधकाम थांबविण्यासाठी वैद्यकीय अधिक्षकांनी उपअभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलडाणा यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे. आयुष इमारत बांधकाम प्रकरणी राष्ट्रीय आरोग्य अभियान आणि शेगाव येथील उपजिल्हा सामान्य रूग्णालय प्रशासनात तारतम्य नसल्याचे दिसून येते.
इमारत बांधकाम अधिकृत असल्याचा दावा!
सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रूग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर बांधण्यात येत असलेल्या आयुष इमारतीच्या बांधकामासाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे शेगाव येथील आयुष इमारतीचे बांधकाम अधिकृत असल्याचा दावा उपअभियंता राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद बुलडाणा यांनी केला आहे.
शेगाव येथील आयुष इमारत बांधकाम प्रकरणी प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता आहे. ई-निविदेद्वारे हा कंत्राट देण्यात आला आहे. या ई-निविदा मुंबई येथून मंजूर करण्यात आल्यात. त्यामुळे आयुष इमारत बांधकाम चुकीचे आणि नियमबाह्य असल्याचे अजिबात म्हणता येणार नाही.
-एस.के.मोरे
उपअभियंता, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जि.प. बुलडाणा.