वन्य प्राण्यांच्या बिळाने सिंचन प्रकल्पाला धाेका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:37 AM2021-05-20T04:37:14+5:302021-05-20T04:37:14+5:30
देऊळगाव कुंडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पश्चिमेकडील बाजूने असलेल्या देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर अज्ञात वन्य प्राण्याने तयार ...
देऊळगाव कुंडपाळ : जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पश्चिमेकडील बाजूने असलेल्या देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्पाच्या भिंतीवर अज्ञात वन्य प्राण्याने तयार केलेले एक मोठे बिळ आढळून आल्याने त्याबद्दल भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले आहे़ धरणाची भिंत पोखरलेली गेल्यास संभाव्य धोकादायक परिस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
लोणार शहरासाठी आरक्षित पाणीसाठा असलेला देऊळगाव कुंडपाळ सिंचन प्रकल्प मागील पावसाळ्यात ओव्हरफ्लो झाला होता. त्यामुळे रब्बी हंगामासाठी अल्प प्रमाणात उपसा सिंचनही झाले आहे़ आता प्रकल्पाच्या भिंतीवर सिंचन क्षेत्रासाठी पाणी सोडणाऱ्या गेटजवळ अज्ञात वन्य प्राण्याने मोठे बिळ तयार करून धरणाची भिंत पोखरल्याचे आढळून आले आहे. सदर बिळ हे कोणत्या प्राण्याचे आहे याबद्दलही कुतूहल निर्माण झाले असून सिंचन विभागाने व वनविभागाने तत्काळ स्थळ निरीक्षण करून धरणाच्या भिंतीवरील ते बिळ बुजवून टाकावे. अशी मागणी होत आहे.
मागील काही दिवसात लोणार सरोवर परिसरात अस्वल सदृश्य रानडुक्कर आढळून आले होते तसेच परिसरात सायाळ ,रानडुक्कर,आदी विविध प्रकारचे वन्य प्राणी सुद्धा आढळून आलेले आहेत .नेमके हे बिळ कोणत्या प्राण्याने तयार आहे .कोणत्या प्राण्याने धरणाची भिंत पोखरुन बस्तान मांडले आहे याबाबत मात्र परिसरात कुतुहलाचे वातावरण निर्माण झाले असून सदरचे बिळ हे कालव्याच्या गेटजवळ असल्यामुळे त्याने धरणाच्या पाण्याचा भिंतीवरील सर्वाधिक दाब तेथे आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता सदर बिळामुळे पोखरलेल्या भिंतीमुळे धरणाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे, संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन बिळ बुजवण्याची मागणी हाेत आहे़