शेकडो कोटींचा निधी मिळूनही सिंचन प्रकल्प उपेक्षीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 04:47 PM2019-09-22T16:47:30+5:302019-09-22T16:48:03+5:30
कोट्यावधीचा निधी मिळूनही सिंचनाचा हा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या नजरेत कायमचा दुर्लक्षीत राहिला.
- प्रवीण खेते
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बुलडाणा विधानसभा मतदारसंघाची तहान भागविण्यासोबतच सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली काढण्याची क्षमता खडकपूर्णा आणि बोदवड प्रकल्पात आहे. दोन्ही प्रकल्प मतदारसंघाबाहेर असले, तरी त्यातून मतदारसंघाला पाणीपुरवठा प्रस्तावित आहे. मात्र, कोट्यावधीचा निधी मिळूनही सिंचनाचा हा प्रश्न लोकप्रतिनिधींच्या नजरेत कायमचा दुर्लक्षीत राहिला.
पिण्याचे पाणी आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा मिटविण्यासाठी बुलडाण्यासाठी खडकपूर्णा, तर मोताळा तुलाक्यासाठी बोदवड प्रकल्पातून पाणी प्रस्तावीत होते. दोन्ही प्रकल्प पूर्णत्वास आल्यास बुलडाणा मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली लागला असता. मतदार संघातील सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न असूनही लोकप्रतिनिधी केवळ निवडणुकीसाठी हा मुद्दा राखून ठेवण्यात येतो. विद्यमान आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनीही तीच भूमीका घेतल्याचा आरोप मतदारांनी केला. इतर विकास कामांचीही हिच गत आहे.
मुख्यत: बुलडाणा शहराचा विचार केल्यास येथील जिल्हा स्त्री रुग्णालय, नाट्यगृह, अंतर्गत रस्ते, कृषी पर्यटन व आॅक्सीजन पार्क, मोताळा तालुक्यातील अल्पसंख्यांक वसतीगृह यासोबतच इतर विकास कामांसाठी शासनाने कोट्यवधीचा निधी मंजुर केला; पण त्यातील एकही काम पूर्ण झाले नाही. शासनाकडून भरघोस निधी मिळूनही कामे पूर्णत्वास येत नसल्याने निधी जातो तरी कुठे, असा सवाल मतदारांमधून उपस्थित केला जात आहे.
२०वर्षांपासून बोदवड प्रकल्प विस्मरणात
बोदवड येथे नियोजित सिंचन प्रकल्पाचे भूमीपुजन तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते १९९९ साली झाले होते. अवर्षणप्रवण भागात मोडणाऱ्या मोताळा तालुक्याला यातील पाणी देण्याचे प्रस्तावित होते. त्यामुळे मोताळा तालुक्यातील तरोळा, कोथळी, इब्राईमपूर, शिरवा, सहस्त्र मोडी, खरवडी, आडवीड, वरूळ या गावांतील सिंचनाचा प्रश्न कायमचा निकाली लागला असता. परंतु, भूमी पुजनानंतर हा प्रकल्प सत्ताधाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या विस्मरणात गेला तो कायमचाच.
सत्ता पक्षाचा नसूनही मतदार संघातील पाणीपुरवठा योजना, रस्ते, वसतीगृह तसेच विविध शासकीय इमारतींच्या विकासकामांसाठी निधी मंजूर करुन आणला. पण, या कार्यकाळात ही कामे पूर्ण करु शकलो नाही, याची खंत राहील.
- हर्षवर्धन सपकाळ, आमदार, बुलडाणा मतदारसंघ
पलढग प्रकल्पाची उंची वाढविल्यास व खोलीकरण केल्यास सिंचनाचा प्रश्न काही अंशी मिटेल. पण या सिंचन प्रकल्पाची आठवण निवडणुकीच्या तोंडावर येते, ही वास्तविकता आहे. प्रत्यक्षात काहीच विकास कामे नाहीत. तालुक्यात केवळ राजकारण चालते, विकास नाही. राजकारण सोडून विकासाकडे लक्ष द्यावे.
- नंदकिशोर किनगे,
भाजपा माजी तालुकाध्यक्ष,
बुलडाणा.
विविध विकास कामांसाठी निधी मंजुर असतानाही कामे पूर्ण झाली नाहीत. यासाठी पाठपुराव्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे झाले नाही.
- विजयराज शिंदे,
माजी आमदार, बुलडाणा मतदारसंघ