भादोलावासीयांनी लोकवर्गणीतून उभारले ' आयसोलेशन सेंटर ' !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 04:34 AM2021-05-14T04:34:09+5:302021-05-14T04:34:09+5:30
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता गावागावात आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी ...
कोरोनाचा वाढता संसर्ग बघता गावागावात आयसोलेशन सेंटर सुरु व्हावे, लोकसहभागातून हा उपक्रम राबविण्यात यावा, असे आवाहन रविकांत तुपकर यांनी केले होते. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. चिखली तालुक्यातील किन्होळा ग्रामस्थांनी तुपकरांच्या आवाहनास प्रतिसाद देत लोकवर्गणीतून कोरोना आयसोलेशन सेंटर उभे केले आहे. त्या पाठोपाठ आता भादोला येथील नागरिकांनी पुढाकार घेतला असून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून उभारलेल्या या आयसोलेशन सेंटरचे १३ मे रोजी जिल्हाधिकारी एस.रामामूर्ती यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी राजेंद्र सांगळे, वरवंड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश राठोड, सरपंच प्रमोदअप्पा वाघमारे, उपसरपंच अमीन खाँसाब, ग्रा.पं.सदस्य मोहन सोनुने, वसंतराव निकम, विनोद चिंचोले, शेषराव मिसाळ, मल्हारी गवई, संजय काळे, हिरालाल जैन, ग्रामसेवक अविनाश मानकर, तलाठी कुळकर्णी यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी, अंगणवाडी सेविका, जि.प. शाळेचे शिक्षक उपस्थित होते. दरम्यान या केंद्राची पाहणी करून जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी भादोला ग्रामस्थांनी घेतलेल्या पुढाकाराचे कौतुक केले. सोबतच प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व मदत या आयसोलेशन सेंटरला केली जाईल, अशी ग्वाही देऊन सर्व गावांनी याप्रमाणे पुढाकार घ्यावा, असे आवाहन केले. रविकांत तुपकर यांनी केवळ प्रशासन आणि शासकीय यंत्रणेवर विसंबून न राहता गावातील नागरिकांनी एकमेकांना आधार देण्यासाठी, मदतीसाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. संचालन संदीप चव्हाण यांनी केले. यशस्वीतेसाठी शिवराजे ग्रुपच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.