बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 02:45 PM2020-02-04T14:45:55+5:302020-02-04T14:46:06+5:30
संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम सुरु केली असून त्यातंर्गत हा कक्ष उभारण्यात आला आहे.
चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे न्यूमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनींग, तपासणी सुरु केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बुलडाणा जिल्ह्यात होऊ नये याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण करुन संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.
कोरोना विषाणूचा धोका पाहता नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, स्वच्छता बाळगावी, असा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला. श्वसन संस्थेचे आजार, सर्दी किंवा फ्ल्यूूसदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तिशी निकट सहवास टाळणे, हाताची नियमित स्वच्छता राखणे, अपुरे शिजवलेले अन्न खावू नये, खोकतांना, शिंकतांना नाका-तोंडाला रुमालचा वापर करावा, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी संपर्क टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या मार्गदर्शनात कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्य विभागाची बैठकही पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक खबरदारीविषयी उपाययोजनांची चर्चा करण्यात करण्यात आली. जिल्ह्यात अद्याप एकही संशयीत आढळलेला नाही. (प्रतिनिधी)
एका चिनी पर्यटकाची जिल्ह्यास भेट
चीनमधील एक नागरिक टूरिस्ट व्हिसावर गेल्या महिन्यात बुलडाणा येथे आला होता. दोन दिवस त्याने शहरात मुक्काम केला होता. जिल्ह्यातील प्रेक्षणिक स्थळे पाहल्यानंतर परत निघून गेला. सध्या जिल्ह्यात चीनचा एकही नागरिक वास्तव्यास नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील पारपत्र विभागाकडून देण्यात आली.