शिधापत्रिकांसाठी 'आधार सिडिंग'चा मुद्दा ऐरणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 12:15 PM2021-01-30T12:15:46+5:302021-01-30T12:15:53+5:30
Ration Cards News अपात्र आणि बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यासाठी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : पाच महिन्यांपेक्षा जास्त अधिक कालावधीपासून धान्य उचल न करणाऱ्या शिधापत्रिकाधारकांच्या आधार सिडिंगचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस पाच लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिका बाद होणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अपात्र आणि बोगस शिधापत्रिका तत्काळ रद्द करण्यासाठी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या जात असल्याची धक्कादायक वस्तुस्थिती समोर आली आहे.
ऑगस्ट ते डिसेंबर महिन्याच्या या पाच महिन्यांच्या कालावधीत राज्यातील सात लक्ष ९५ हजार १६८ शिधापत्रिकांवर एकदाही धान्याची उचल करण्यात आली नाही. अशा शिधापत्रिकांची जिल्हानिहाय तपासणी केली जात आहे. दरम्यान, गत पाच महिन्यांत एकदाही धान्य न घेणाऱ्या मात्र, यापुढे धान्य घेण्यास इच्छुक असलेल्या लाभार्थ्यांच्या संपूर्ण कागदपत्रांची तपासणी, पडताळणी आणि आधार सिडिंग केली जाणार आहे. त्यानंतरच १४ फेब्रुवारी, २०२१ नंतर या शिधापत्रिका उचित योजनेत वर्ग केल्या जातील.
बुलडाणा जिल्ह्यात १८ हजार शिधापत्रिका!
बुलडाणा जिल्ह्यातील तब्बल १८ हजार १४३ शिधापत्रिकांवर गत पाच महिन्यांत धान्याची उचल करण्यात आलेली नाही. या शिधापत्रिकाधारकांच्या आधार सिडिंगचा मुद्दा चव्हाट्यावर आल्याने, अनेकांनी स्वत:हून धान्य उचल केली नसल्याचे समोर आले आहे.
अनेकांची नावे दोन शिधापत्रिकेत!
सार्वजनिक धान्य वितरण प्रणालीतील अनियमिततेला आळा घालण्यासाठी शासनाने शिधापत्रिका संगणकीकृत केल्या आहेत. या शिधापत्रिकांसाठी आधार सिडिंग अनिवार्य केले आहे. दोन शिधापत्रिकांमध्ये नाव असलेल्यांचे धान्य वितरण आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीतील धान्य गळतीला आळा बसण्याचे संकेत आहेत.
धान्य घेण्यास इच्छुक असणाऱ्यांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. शिधापत्रिकेसाठी कुठेही आधार सिडिंग केलेले नसेल, तरच त्यांची नावे नवीन शिधापत्रिकेसाठी ग्राह्य धरल्या जातील. कुणावरही अन्याय होणार नाही, याचीही योग्य ती खबरदारी घेतली जाईल.
- व्ही. एम. व्हनमाने
पुरवठा निरीक्षक,
खामगाव