पाऊस सुरूच; पेनटाकळीच्या जलसाठ्यात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 01:09 PM2020-06-16T13:09:04+5:302020-06-16T13:09:16+5:30
बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली.
बुलडाणा: गेल्या तीन ते चार दिवसापासून जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाचा १५ जून रोजी जिल्ह्यात काहीसा जोर कमी झाला होता. परिणामी शेतकऱ्यांनी आता पेरणीची लगबग सुरू केली होती. मात्र सायंकाळ दरम्यान बुलडाणा शहरासह लगतच्या ग्रामीण भागात पावसाने पुन्हा जोर पकडल्याने शेतकऱ्यांची धावपळ झाली.
बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस पडला असून रविवारी बुलडाणा तालुक्यात पाच मिमी तर मोताळातालुक्यात सहा मिमी पावसाची नोंद झाली. प्रामुख्याने शेगाव, मलकापूर, जळगाव जामोद, सिंदखेड राजा तालुक्यात या पावसाने जोरदार हजेरी लावलेली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हा मलकापूर तालुक्यात पडला येथे पावसाची सरासरी २६ टक्के आहे तर जळगाव जामोद तालुक्यात ही सरासरी २३ टक्के आहे. बुलडाणा तालुक्यात ती १६ टक्के आहे. अन्य तालुक्यात दहा ते हा टक्क्यादरम्यान हा पाऊस झाला आहे. पावसाने उघडीप देताच शेतकºयांनी पेरणीसाठीची अनुकल परिस्थिती पाहत पेरणीस प्रारंभ केला.
गतवर्षीच्या तुलनेत सात टक्के अधिक पाऊस
गेल्या वर्षी बुलडाणा जिल्ह्यात १५ जून पर्यंत सरासरी अवघा ५.२ मिमी पाऊस झाला होता. त्या तुलनेत यंदा सात टक्के पाऊस अधिक झाला आहे. एकंदरीत १५ जून पर्यंत यंदा जिल्ह्यात ९५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यात वार्षिक सरासरी ७६१.६ मिमी पाऊस पडत असतो. त्यापैकी आतापर्यंत ९५.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा बुलडाणा जिल्ह्यावर मेहरबान झाल्याचे चित्र आहे.