गौरी आवाहनाच्या दिवशी बाया नाचविणे हा मातृशक्तीचा अपमान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 02:34 PM2019-09-07T14:34:41+5:302019-09-07T14:34:53+5:30
गौरी आवाहनाच्या दिवशी 'बाया नाचविणे' हा मातृशक्तीचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.
खामगाव: शासकीय निधीतून बचत गटाचा मेळावा जात असतानादेखील या मेळाव्यात स्थानिक लोकप्रतिनिधी स्वत:चा उदोउदो करून घेत आहे. एका राजकीय पक्षाचे झेंडे याठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यामुळे हा मेळावा म्हणजे सत्ताधा?्यांचा चमकोगिरीचा प्रयत्न असून गौरी आवाहनाच्या दिवशी 'बाया नाचविणे' हा मातृशक्तीचा अपमान असल्याचा आरोप काँग्रेस गटनेत्या अर्चना टाले यांनी केला आहे.
स्थानिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर महिला बचत गटाचा मेळावा आयोजित केला आहे. शासकीय निधीतून हा कार्यक्रम घेण्यात येत असला तरी लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर जयंतीनिमित्त हा मेळावा घेण्यात येत असल्याचा प्रचार सत्ताधारी करीत आहेत. दरम्यान, मेळाव्यात पहिल्या दिवसापासूनच गोरगरीब महिलांच्या भावनांशी खेळ सुरू आहे. पहिल्याच दिवशी कोणतीही सुविधा न देण्यात आल्याने बचत गटाच्या अनेक महिलांनी निर्मित केलेल्या मालाची मोठया प्रमाणात नासाडी झाली. काही बचत गटाच्या महिला स्टॉल न लावताच परतल्या. त्यामुळे मैदानावर उभारण्यात आलेली निम्मे स्टॉल खाली आहेत. १२५ पैकी केवळ ६०-७० स्टॉल लागली आहेत. पहिल्या दिवशी गर्दी न जमल्याने कार्यक्रमाला उशिरा सुरुवात करण्यात आली. यादिवशी आयोजित एका हास्य आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमाला जेमतेम २०-२५ जणांची उपस्थित होते. या दिवशीचा कार्यक्रम फसल्यानंतर दुसऱ्यादिवशी म्हणजे गुरुवारी गर्दी जमविण्यासाठी चक्क लावणी आणि नाच गाण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. ऐन गौरी आवाहनाच्या दिवशी लावणीचा कार्यक्रम घेऊन बाया नाचविणे म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या दूरबुद्धीचा कळसच होय. महिलांच्या सणासुदीला कार्यक्रम आयोजित केल्याने त्यांना कोणताही रोजगार मिळू शकला नाही. मात्र, जनतेच्या पैशातून सत्ताधारी प्रसिद्धीची हौस फिटऊन घेत आहेत. नगर पालिकेतील सत्ताधारी, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बंधू यांना लोकनेते स्व. भाऊसाहेब फुंडकर यांच्या विषयी कोणतीही आस्था नाही; असती तर त्यांनी भाऊसाहेबांच्या नावाचा दुरूपयोग करून मेळावा आयोजित करून गोरगरीब महिलांच्या भावनांशी खेळ केला नसता. केवळ आपल्या टक्केवारीसाठीच हा मेळावा आयोजित केल्याचा घणाघात देखील अर्चना टाले यांनी केला. याप्रकरणी जिल्हाधिकारी आणि वरिष्ठ स्तरावर तक्रार केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नगराध्यक्ष अनिता डवरे यांच्याशी संपर्क केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाही.
सत्ताधाºयांच्या निर्लज्जपणाचा कळस!
महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच त्यांनी निर्मित केलेल्या विविध वस्तू आणि कलाकृतींना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांच्या मालाची नासाडी करून अनेकांचा रोजगार हिराऊन घेत, बाया नाचविणे म्हणजे सत्ताधाºयांचा निर्लज्जपणाच होय. गौरींच्या आवाहनाच्या दिवशी बाया नाचऊन समस्त मातृशक्तीचा अपमान केला आहे. एकीकडे महिला बचत गटाच्या स्टॉलवर प्लास्टिकचे आच्छादन नसताना दुसरीकडे लावणीच्या कार्यक्रमावर उधळपट्टी कशासाठी, असा प्रश्नही गटनेत्या अर्चना टाले यांनी उपस्थित केला.
नगरपालिका सत्ताधाºयांसाठी भ्रष्टाचाराचे कुरण बनली आहे. मलिद्यासाठी त्यांची आप-आपसातच जुंपत आहे; त्यामुळे त्यांच्याकडून जनता आणि महिलांनी अपेक्षा करणे गैर आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी केवळ टोल घेण्यापूरतेच नगर पालिकेत येतात. सणासुदीच्या दिवसांत गर्दी जमणार नाही; हे माहित असतानाही केवळ प्रसिध्दी साठीच हा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यामुळे बचत गटातील कोणत्याही महिलेचं भलं झालं नाही. उलट अनेक महिलांना मनस्ताप आणि नुकसानच झाले.
- अर्चना टाले गटनेत्या कांग्रेस, नगर परिषद, खामगाव.