आवडीच्या क्षेत्राची निवड करणे महत्वाचे - प्रांजली कंझारकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2020 04:36 PM2020-01-27T16:36:31+5:302020-01-27T16:36:47+5:30
माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.
- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : आपल्याला जे आवडते, त्याचीच निवड करणे सर्वात महत्वाचे आहे. बरेचदा आवडीविरूध्द क्षेत्र निवडल्याने आयुष्यात गोंधळ उडतो. त्यामुळे आवडीचे क्षेत्र निवडण्याचे धैर्य आणि त्याला कुटूंबियांचीही तितकीच साथ; यावरच यश अवलंबून असते. माझ्या इथवरच्या प्रवासात हेच महत्वाचे ठरले, असे मत ‘बबन’ चित्रपटातून चर्चेत आलेली नवोदित अभिनेत्री प्रांजली कंझारकर हीने बोलताना व्यक्त केले.
अभिनय या क्षेत्राकडे कश्या वळल्या?
लहानपणापासूनच मला नाटकात काम करायची सवय होती. शाळेमध्ये असताना सांस्कृतिक कार्यक्रम हा माझ्या आवडीचा विषय होता. तेव्हापासून टीव्हीवर दिसणाऱ्या नट्या आकर्षित करायच्या. आपणही टीव्हीवर दिसावे, असे सारखे वाटायचे. तोच ध्यास शेवटी सत्यात उतरला.
अभिनय करण्याची संधी केव्हा मिळाली?
मुळात मी इंजिनिअरिंग करायला पुण्यात आले. बीई करीत असताना सन २०१६ मध्ये सेंकड इअरमधे होते. त्याचवेळी पुण्यात ‘बबन’ चित्रपटसाठी आॅडिशन सुरू होते. त्यात मी सहभागी झाले, आणि माझी निवड झाली. डिसेंबर २०१६ मध्ये हे आॅडिशन झाले आणि त्यानंतर २४ फेब्रुवारी २०१७ ला पहिल्यांदा प्रत्यक्ष सेटवर अभिनय करण्याची संधी मिळाली. तेव्हापासून हा प्रवास सुरूच आहे.
नाटकांच्या प्रवासाबद्दल काय सांगाल?
ती पहिली रात्र, कुर्यात सदा टिंगलम ही महत्वाची दोन नाटके आहेत. यासह इतरही अनेक छोट्या नाटकांमध्ये मी काम केले. परंतु जेव्हा बबन हा चित्रपट २३ मार्च २०१८ मध्ये दिग्दर्शीत झाला, तेव्हाच खरी माझी ओळख झाली. मुख्य नायिकेच्या मैत्रिणीचा रोल मला मिळाला. मी त्या भुमिकेला पुर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासूनच खºया अर्थाने मला ग्लॅमर प्राप्त झाले. सध्या आणखी दोन नवीन चित्रपटात काम करायचे आहे. फेब्रुवारीमध्ये त्याचे काम सुरू होईल.
नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?
संयम सर्वात महत्वाचा आहे. अभिनय क्षेत्रात सातत्याने स्पर्धा राहते, ती टिकून राहण्याची. काही वर्षांआधी मोठे नाव कमविलेल्या अनेक अभिनेत्री सध्या पडद्यावर दिसत नाहीत. ही अवस्थाच सगळ्यात आव्हानात्मक आहे. त्यामुळे मिळेत त्या परिस्थिती मिळेल ते काम करण्याची तयारी असली, की नैराश्य येत नाही. सध्याही आपण अनेक महान कलावंतांना अगदी छोट्या जाहीरातीत काम करताना पाहतो. मनाची ही तयारीच आपल्याला सदोदित प्रेक्षकांच्या नजरेसमोर ठेवते. त्यामुळेच कोणतीही भुमिका मिळाली तरी त्या भुमिकेला न्याय देण्यासाठी झटण्याची तयारी असली, म्हणजे अपयशाचे तोंड पाहावे लागत नाही.