तासिका तत्त्वावरील गुरुजींवर आली मजुरीची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:41 AM2021-09-08T04:41:32+5:302021-09-08T04:41:32+5:30
संदीप वानखडे बुलडाणा : राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त प्राध्यापकांची पदे रिक्त असताना शासन परवानगी देत नसल्याचे चित्र ...
संदीप वानखडे
बुलडाणा : राज्यभरातील महाविद्यालयांमध्ये जवळपास १२ हजारांपेक्षा जास्त प्राध्यापकांची पदे रिक्त असताना शासन परवानगी देत नसल्याचे चित्र आहे़ या रिक्तपदावर तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची तुटपुंज्या मानधनावर नियुक्ती करण्यात येते़ गत वर्षापासून महाविद्यालये बंद असल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचा राेजगार गेला आहे़ त्यामुळे उच्च शिक्षित असूनही मजुरी करण्याची वेळ तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर आली आहे़
बुलडाणा जिल्ह्यासह राज्यातील अनेक महाविद्यालयात नियमित प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत़ या रिक्त पदांचा कार्यभार हाकण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती करण्याची पद्धत सुरू झाली़ हीच पद्धत पुढे सुरूच असून तुटपुंज्या मानधनावर पात्रताधारक प्राध्यापकांची नियुक्ती करण्यात येते़ दर महिन्याला वेतन देण्याची मागणी करूनही तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना वर्षाच्या शेवटी मानधन देण्यात येते़ तेही वेळेवर मिळत नाही़ दुसरीकडे तेच काम करणाऱ्या नियमित प्राध्यापकांना लाखाेंचे वेतन नियमित मिळते़ गतवर्षीपासून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्तीही करण्यात आली नसल्याने अनेक नेट, सेट, पीएच. डीधारक प्राध्यापकांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे़
सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच
सेट-नेट झालेले शेकडो उच्च शिक्षितांची समस्याही गंभीर बनली आहे. उच्च शिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे. त्यांची नियुक्ती किंवा रोजगार उपलब्ध केला नाही, तर त्यांचे वय वाढेल. त्यांची कौशल्यशक्ती संपत आहे. नेट-सेट, पीएच.डी, एमफील करण्यासाठी जीवनातील ७-८ वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही.
प्राध्यापक भरतीसाठी डोनेशन मागितल्या जाते. एवढा पैसा आणावा तरी कुठून, त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून भरती प्रक्रियाही आयोगामार्फत करावी. सहायक प्राध्यापकांनी प्रति दिवस दीड हजार रुपये मानधन द्यावे, तसेच मानधन दरमहा देण्याची गरज आहे़
समान काम समान वेतन देण्याची मागणी तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांनी केली आहे़
१० वर्षांपासून लटकला प्रश्न
सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. राज्यातील १३ हजारांवर सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आंदोलने केल्यावर संघटनांना केवळ भरतीचे आश्वासन दिले जाते; परंतु पुढे काहीच केल्या जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती तासिका दरात वाढ करण्याची घाेषणा राज्य शासनाने केली आहे़; मात्र त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही़ प्राध्यापकांच्या रिक्त जागा भरण्याचा प्रश्न प्रलंबितच आहे़
राज्यात १२ हजारापेक्षा जास्त प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत़ शासन प्राध्यापक भरतीला परवानगी देत नसल्याने शेकडाे तासिका तत्त्वावरील प्राध्यापक अडचणीत सापडले आहेत़ गतवर्षीपासून महाविद्यालये बंद असल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांवर राेजंदारी करण्याची वेळ आली आहे़
प्रा़ अभिजीत देशमुख
काेराेनामुळे महाविद्यलये बंद असल्याने तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना नियुक्तीच देण्यात आलेली नाही़ काेराेनाच्या काळात नियमीत प्राध्यापकांच्या पदाेन्नत्या सुरू असून त्यांना पगारवाढ देण्यात येत आहे़ दुसरीकडे नियमीत तसेच सीएचबी प्राध्यापकांच्या नियुक्तीसाठी शासन पैसे नसल्याचे सांगते़. हे धोरण सर्वथा समर्थनीय, अन्यायकारक तथा पक्षपाती आहे.
डॉ़ भगवान इंगळे
नियमित प्राध्यापकांचा कार्यभार करण्यासाठी तासिका तत्त्वावरील प्रध्यापकांची नियुक्ती करण्यात येते़ तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांना देण्यात येणारे मानधन अत्यंत ताेकडे आहे़ समान काम समान वेतन देण्याची गरज आहे़
निकीता निर्मळ