जे. पी. नड्डा, पवार, ठाकरे, वासनिक यांच्या रविवारी सभा
By सदानंद सिरसाट | Published: April 20, 2024 05:25 PM2024-04-20T17:25:58+5:302024-04-20T17:27:00+5:30
मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत.
खामगाव (बुलढाणा) : लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात उमेदवारांचा प्रचार आता शिगेला पोहचत आहे. त्यासाठी दिग्गज नेत्यांची हजेरीही लागत आहे. उद्या रविवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची वरवट बकाल येथे सभा होत आहे. तर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, उद्धवसेनेचे उद्धव ठाकरे, काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची खामगावात सायंकाळी सभा होत आहे.
मतदानासाठी आता अवघे चार दिवसच उरले आहेत. त्यामुळे मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती, महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी राष्ट्रीय, राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा नियोजित आहेत. त्यामध्ये महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची रविवारी १२.२५ वाजता वरवट बकाल येथे सहकार विद्या मंदिराच्या प्रांगणात सभा होत आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी मंत्री डाॅ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री, आमदार डाॅ. संजय कुटे, आमदार आकाश फुंडकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. नड्डा यांच्या कार्यक्रमानुसार त्यांचे जळगाव विमानतळावर आगमन होऊन हेलिकाॅप्टरने वरवट येथे पोहचणार आहेत. तेथील सभा आटोपून ते कर्नाटकातील हुबळी येथे जाणार आहेत.
महाविकास आघाडीच्या नेत्यांची मांदियाळी
महाविकास आघाडीचे उमेदवार प्रा. नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ उद्या खामगावातील जे. व्ही. मेहता स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी ५ वाजता सभा होत आहे. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव मुकूल वासनिक, उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या नेतृत्वात तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी शहर काँग्रेस अध्यक्षा सरस्वती खासने, तालुकाध्यक्ष मनोज वानखडे यांनी नियोजन केले आहे. त्यानुसार या सभेत मोठ्या प्रमाणात महिलांसह नागरिकांची उपस्थिती राहणार असल्याचा विश्वास खासणे यांनी व्यक्त केला आहे.