भारतीय जैन संघटना जलक्रांती निर्माण करणार - देशलहरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 01:33 AM2018-02-16T01:33:36+5:302018-02-16T01:34:01+5:30
देऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण्ड विना मोबदला उपलब्ध करून देणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
देऊळगावराजा : संपूर्ण बुलडाणा कायम स्वरुपी दुष्काळमुक्त करण्याकरिता ‘सुजलाम सुफलाम’ हे ब्रिदवाक्य समोर ठेवत भारतीय जैन संघटना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठे धरणातील गाळ काढणेकरिता शासकीय यंत्रणेला १00 जेसीबी व ३५ पोकलॅण्ड विना मोबदला उपलब्ध करून देणार आहे. जेसीबी जलयुक्तच्या या कामाला प्रत्यक्षात ३ मार्चपासून सुरुवात होणार असल्याची माहिती संघटनेचे मुख्य सचिव समन्वयक राजेश देशलहरा यांनी दिली.
यावेळी आयोजित जैन समाज बांधवांच्या १२ फेब्रुवारी रोजी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी समिती सदस्य जयचंद बाठीया, शीतल गादिया उपस्थित होते. देशलहरा म्हणाले की, भारतीय जैन संघटनेद्वारे गेल्या ३0 वर्षांपासून राज्यासह संपूर्ण देशात विविध सामाजिक उपक्रम राबविले जात आहेत. यापूर्वी भूकंप, नैसर्गिक आपत्तीमध्ये योगदान, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, त्यांच्या पाल्यांना मोफत शिक्षणाच्या व्यवस्थेसह त्यांच्या निवासाची व्यवस्था केलेली आहे.
गेल्या वर्षीपासून ‘जल है तो कल है’ प्रमाणे पाण्याची गरज ओळखून ठिकठिकाणी धरणातील गाळ काढण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तर यावर्षी संघटनेने संपूर्ण बुलडाणा जिल्हा दुष्काळमुक्त करण्याकरिता नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली आहे. प्रथम टप्प्यात १00 जेसीबी व ३५ पोकलॅन्डद्वारे जिल्हय़ातील सर्वच लहान-मोठय़ा धरणातील गाळ काढण्याचे निश्चित झाले आहे. मशिनरी संघटनेची तर इंधन शासनाचे, असा करारनामा यापूर्वी करण्यात आला आहे.
दे.राजा तालुक्यातील ज्या-ज्या धरणातील गाळ काढावयाचा आहे, त्याचे नियोजन शासकीय यंत्रणेने केले आहे. या कामाकरिता तालुक्याला १0 जेसीबी व २ पोकलॅन्ड मिळणार आहेत. गत दोन वर्षांपासून लोकसहभागातून शहरातील आमना नदीचा फार मोठय़ा प्रमाणात गाळ काढून पाण्याच्या पातळीत वाढ करणेस मदत झालेली आहे. शहरात आयोजित या सभेला राजेश देशलहरा, जयचंद बाठीया, शीतल गादिया, जिल्हा कार्यकारिणी सदस्य सन्मती जैन, तालुका अध्यक्ष मनिष कोठेकर, शहर अध्यक्ष निलय जिंतूरकर, राजेंद्र दुगड, कविश जिंतूरकर, नंदन दर्यापूरकर सह भारतीय जैन संघटनेच्या पदाधिकार्यांसह सकल जैन समाजातील समाज बांधव उपस्थित होते.