अतिक्रमण काढण्यासाठी जयपूर ग्रामस्थांचे उपोषण; काहींनी शासकीय जमिनीवर केली शेती
By ब्रह्मानंद जाधव | Published: June 19, 2023 05:35 PM2023-06-19T17:35:45+5:302023-06-19T17:36:40+5:30
मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सारंगधर सातव यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
मोताळा : तालुक्यातील जयपूर येथील शासकीय जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी १९ जूनरोजी जयपूर येथील ग्रामस्थांनी मोताळा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नसल्याचा आक्रमक पवित्रा सारंगधर सातव यांच्यासह उपोषणकर्त्यांनी घेतला आहे.
मोताळा तालुक्यातील जयपूर येथे पूर्वी शासकीय जमिनीवर चराईचे मोठे क्षेत्र होते. गावातील गुरांना चारण्यासाठी पूर्वी बाराही महिने या शासकीय जमिनीचा उपयोग होत होता. परंतु आता काही बाहेरील गावातील नागरिकांनी काही सत्ताधारी लोकांना हाताशी धरुन जयपूर येथील शासकीय जमीन सरकारच्या नावावर असताना त्या पडीक जमिनी तयार करून त्यावर पेरणी करीत आहेत. त्या जमिनीवर गावातील जनावरे गेली असता, शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकीसुध्दा अतिक्रमणधारक देत आहेत. यामुळे गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. ग्रामपंचायत प्रशासनाकडे जयपूर ग्रामस्थांनी वेळोवेळी तक्रारीसुध्दा केल्या आहेत. परंतु प्रशासनाने कोणत्याच प्रकारची दखल घेतलेली नाही. सध्या जयपूर गावात सरकारची एक एकरसुध्दा जमीन उपलब्ध नाही.
शासकीय जमिनीवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी जयपूर येथील सामाजिक कार्यकर्ते सारंगधर निवृत्ती सातव व ग्रामस्थांनी १९ जूनपासून मोताळा तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आता मोताळा तहसील प्रशासन अतिक्रमणधारकांवर काय कारवाई करते, याकडे मोताळा तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे.