जळगाव जामोद व संग्रामपूर तालुक्यातील जातीच्या दाखल्यांचे प्रस्ताव पडून!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2019 04:22 PM2019-01-12T16:22:28+5:302019-01-12T16:22:33+5:30
संग्रामपूर: संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे जातीचे व नॉनक्रिमिलेअर दाखल्यांचे सुमारे साडेचारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत
संग्रामपूर: संग्रामपूर व जळगाव जामोद या दोन्ही तालुक्यातील एक महिन्यापासून उपविभागीय कार्यालय जळगाव जामोद येथे जातीचे व नॉनक्रिमिलेअर दाखल्यांचे सुमारे साडेचारशे प्रस्ताव प्रलंबित आहेत. यावर त्वरीत निर्णय घेण्यात न आल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थिनींना विविध कामांसाठी जातीचा तसेच नॉन क्रिमीलेअर दाखला आवश्यक आहे. जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी सेतूच्या माध्यमातून आॅनलाईन प्रस्ताव दाखल केले आहेत. कागदपत्राची पूर्तता करीत प्रस्ताव तहसील कार्यालय संग्रामपूर येथे गेले. तेथील प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रस्ताव जळगाव जामोद येथे उपविभागीय कार्यालयात सादर करण्यात आले. परंतु प्रस्ताव सादर करून एक महिन्याचा कालावधी उलटला तरीही उपविभागीय कार्यालयाकडून याबाबत निर्णय घेण्यात आला नाही. यात संग्रामपूर तालुक्यातील दोनशेच्यावर प्रस्ताव आॅनलाइन सर्व्हरवर पडून आहेत. यावरून प्रस्तावाची पाहणी करून विद्यार्थ्यांना जातीचे दाखले देण्याकरिता अधिकºयांकडे वेळ नसल्याचे दिसून येत आहे. उपविभागीय कार्यालयाच्या वेळकाढू धोरणामुळे विद्यार्थी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश, स्कॉलरशिप, नोकरीसह विविध कामांसाठी दोन्ही दाखले आवश्यक आहेत. हे दाखले सादर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना लाभ घेता येत नसल्यांने त्यांना त्रास सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे याची जाणीव असतांनादेखील याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांकडून होत आहे. अनेक दिवसांपासून दाखल्यांसाठी तारीख पे तारीख मिळत आहे. नागरीकांचा वेळ व पैसा वाया वाया जाऊ नये, यासाठी आॅनलाईन प्रणाली अवलंबविण्यात आली असली, तरी महसूल अधिकारी व कर्मचाºयांच्या दिरंगाईचा फटका विद्यार्थ्यांना बसत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष देवून विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे. (तालुका प्रतिनिधी)