जळगाव जामोद : श्री सखाराम महाराज पालखीचे पंढपूरकडे प्रस्थान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 03:47 PM2018-06-29T15:47:22+5:302018-06-29T15:49:31+5:30
जळगाव जामोद : टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : टाळ मृदंगाचा निनाद व हरीनामाच्या गजरात सखारामपुर (इलोरा) संस्थान येथून श्री संत सखाराम महाराजांची पालखी मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी पंढरपुरकडे मार्गस्थ झाली. यावेळी पंचक्रोशीतील हजारो स्त्री-पुरूष भाविकांनी वारकºयांचे दर्शन घेत ‘श्रीं’च्या पालखीला भक्तीभावाने निरोप दिला.
यावेळी ‘होय होय वारकरी, पाहे पाहे रे पंढरी’, काय करावी साधने फल अवघेची देणे’ या अभंगांच्या गजराने संपुर्ण आसमंत दुमदुमूला. सर्वप्रथम संस्थानचे अध्यक्ष हभप तुकाराम महाराज व मलकापूर मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी श्री संत सखाराम महाराजांच्या मुर्तीचे व पालखीतील पादुकांचे पुजन केले. त्यानंतर बँड, पताका, घोडे, टाळकरी, विणेकरी, मृदंग वादक अशा राजवैभवी थाटात इलोरा (सखारामपुर) येथून श्री सखाराम महाराजांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान सुरू झाले. विठ्ठल माझा माझा, मी विठ्ठलाचा’ या अभंगाने वारकरी मार्गस्थ होत असताना पंढरीच्या विठ्ठलाची ओढ भाविकांच्या अंतकरणात दिसून येत होती.
या पालखी समवेत श्री सखाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज, आ.चैनसुख संचेती, संस्थानचे व्यवस्थापक श्रीकृष्णदादा पाटील, भैय्याभाऊ बकाल, गजाननबापु देशमुख, नानासाहेब शित्रे पाटील, राजु ठाकरे, नितीन महाराज, संतोष महाराज, महादेव महाराज, बाबुराव पाटील, संतोष पाटील यांनी भास्तनपर्यंत पायीवारी केली. या पालखी सोहळ्यात १५० वारकरी सहभागी असून सोपानबुवा हे पालखीचे मुख्य चालक आहे. शुक्रवारी सकाळी ८ वा. इलोºयावरून या पालखीचे प्रस्थान झाले.
सव्वाशे वर्षाची परंपरा
बुलडाणा जिल्ह्यात सर्वात आधी पंढरीची पायीवारी करणारी ही पालखी समजली जाते. श्री संत सखाराम महाराजांनी स्वत: तब्बल ६० वर्षे पंढरीची पायीवारी केली. तसेच त्यांनी बुलडाणा, अकोला, जळगाव खान्देश, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पायी फिरून वारकरी संप्रदायाचा प्रचार व प्रसार केला. अशिक्षित असलेल्या सखाराम महाराजांना ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा, एकनाथी भागवत आदी सर्व ग्रंथ मुखोदगत होते. श्री संत सखाराम महाराजांनंतर पंढरीच्या पायीवारीची परंपरा गुरूवर्य श्रीराम महाराज (बोवासाहेब) यांनी कायम ठेवली. सध्या संस्थानचे अध्यक्ष तुकाराम महाराज हिच परंपरा पुढे चालवित असल्याने या पंढरीच्या पायीवारीला सव्वाशे वर्षाचा इतिहास निर्माण झाला आहे.
माऊलीची जी पायीवारी आळंदीवरून निघते त्यामध्ये तुकाराम महाराजांचा पंढरीची पायीवारी करतात. विशेष म्हणजे पाच वर्षापुर्वी तुकाराम महाराजांनी आजारी असतांनाही वारीत खंड पडू दिला नाही. या माऊलीच्या वारीत श्री संत सखाराम महाराज संस्थानला विशेष स्थान असून एका फडावर हभप तुकाराम महाराज यांची किर्तनसेवा असते. यामुळे जळगाव तालुक्याचे नाव महाराष्ट्राच्या सर्व वारकºयांपर्यंत पोहचले आहे. (तालुका प्रतिनिधी)