जळगाव जामोद तालुका : थकबाकीने जीवन प्राधिकरण घायाळ!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 02:03 AM2018-03-29T02:03:19+5:302018-03-29T02:03:19+5:30
जळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थकबाकी ही चक्क ९ कोटी ३६ लाख ३७ हजार ३५६ वर जाऊन पोहचली असून, या आर्थिक वर्षात पाणीपट्टीची वसुली फक्त १८ लाख असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अक्षरश: घायाळ झाला आहे.
नानासाहेब कांडलकर।
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत जळगाव जामोद येथील पाणी पुरवठा योजना राबविल्या जात असून, इतर शहरांच्या तुलनेत जळगाव नगरातील नळधारकांना बºयापैकी पाणी पुरवठा केल्या जातो; परंतु अनेक नळधारकांनी काही वर्षांपासून पाणी बिल न भरल्याने थकबाकी ही चक्क ९ कोटी ३६ लाख ३७ हजार ३५६ वर जाऊन पोहचली असून, या आर्थिक वर्षात पाणीपट्टीची वसुली फक्त १८ लाख असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभाग अक्षरश: घायाळ झाला आहे. थकीत नळधारकांना नवीन पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा करताना अडचणी निर्माण होणार असून, थकीत बिलाची रक्कम भरण्याचा आर्त टाहो जीवन प्राधिकरण विभाग करीत आहे.
जळगाव जामोद येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत १९७१ मध्ये पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाली. त्यावेळी जळगावकरांना चोवीस तास पाणी पुरवठा केल्या जात आहे. ही स्थिती १९८६ पर्यंत कायम होती, त्यानंतर मात्र सकाळी व सायंकाळी पाणी पुरवठा केला जात असे. नळधारकांची वाढत गेलेली संख्या व पाण्याचे कमी होत गेलेले स्रोत यामुळे १९९५ पासून नगरात पाणी टंचाईला सुरुवात झाली. या योजनेची मुदतसुद्धा २००१ ला संपली. त्यामुळे जीवन प्राधिकरण विभागाकडून या योजनेवर कोणताही खर्च करणे बंद झाले. पुढे पुढे पाण्याचे स्रोत अत्यंत कमी झाल्याने व पाइपलाइनचे चोकअप वाढल्याने नगराच्या काही भागात पाणी मिळणेच दुरापास्त झाले. इतर नळधारकांनाही पाणी मिळण्यासाठी नळाला मोटार लावणे गरजेचे झाले. या सर्वांचा परिणाम असा झाला, की बहुतांश नळधारकांनी पाणी बिल भरणेच बंद करून टाकले. त्यामुळे थकबाकी वाढत गेली. दोन वेळा थकीत बिलावरही व्याज माफीची घोषणाही करण्यात आली. फक्त पूर्ण मुद्दलाची रक्कम भरणे गरजेचे होते. त्याचा फार कमी पाणी ग्राहकांनी फायदा घेऊन नळ बिल ‘निल’ केले.
सध्या नगरात २२४३ नळधारक आहेत. त्यातील सुमारे १५०० पेक्षा जास्त नळधारक थकीत आहेत. थकीत बिलामुळे मुद्देलापेक्षाही व्याजाची रक्कम जास्त झाली आहे. नळधारकांकडे ३ कोटी ९४ लाख ५१ हजार २४६ एवढी मूळ थकबाकी आहे; परंतु अनेक वर्षे पाणी बिल न भरल्याने या थकबाकीच्या व्याजाची रक्कम चक्क ४ कोटी ६३ लाख ९७ हजार ८५६ एवढी झाली आहे.
मुद्दल अधिक व्याज मिळून नळधारकांची थकबाकी ८ कोटी ५८ लाख ३९ हजार ०६२ एवढी आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शासनाला व्याजाच्या माफीचा आदेश काढण्याची गरज आहे.
नगर परिषदही थकबाकीच्या भोवºयात
नगर परिषदेचे सध्या नगरात फक्त तीन स्टॅण्ड पोस्ट (सार्वजनिक नळ) आहेत; परंतु मागील २० वर्षांत ही संख्या खूप जास्त होती. त्यामुळे नगर परिषदेची पाणी बिलाची थकबाकी लाखोंच्या घरात गेली आहे. सध्या नगर परिषदेकडे ७७ लाख ८८ हजार २९४ एवढी पाणी बिलाची थकबाकी आहे. त्यापैकी फक्त २३ लाख ७५ हजार ७२७ एवढे मुद्दल असून, ५४ लाख १२ हजार ५६७ म्हणजे दुपटीपेक्षाही जास्त व्याज आहे. या सर्व थकबाकीच्या चक्रव्यूहात मार्ग कसा काढावा, हा प्रश्न सध्या जीवन प्राधिकरण विभागाला भेडसावतो आहे.
नवीन नळ कनेक्शनच्या वेळी थकितांची अडचण
जळगाव नगरात वान धरणावरील पाणी पुरवठ्याची नवीन योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून येत्या काही महिन्यांत कार्यान्वित होणार आहे. नवीन टाकींची उभारणी व नवीन पाइपलाइन आदींचे काम पूर्णत्वाकडे येत आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पाइपलाइनवरून नळ कनेक्शन दिल्या जाईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर नवीन पाइपलाइनवरून नळ कनेक्शन दिल्या जाईल. त्यावेळी जे थकीत ग्राहक आहेत, त्यांना कनेक्शन मिळणार की नाही, हा प्रश्न उभा ठाकणार आहे. आ.डॉ. संजय कुटे यांची भूमिका ही पाणी बिल भरलेच पाहिजे, अशी आहे. त्यामुळे काही महिन्यांनंतर नगरात नळ कनेक्शनवरून मोठा हल्लकल्लोळ होण्याची शक्यता आहे.