नळगंगा नदीपात्रातील जलपर्णी काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 01:55 PM2019-05-13T13:55:41+5:302019-05-13T13:56:36+5:30
निवेदनाची दखल घेत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात १२ मे पासून प्रारंभ केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : नळगंगा नदी पात्र जलपर्णी वनस्पतीच्या वेढ्यात सापडले असून या वनस्पतीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याबाबत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नगर पालिका प्रशासनाला निवेदन देवून सदर नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती तात्काळ काढण्यात यावी अन्यथा २७ मे पासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देताच नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी या निवेदनाची दखल घेत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला प्रत्यक्षात १२ मे पासून प्रारंभ केला आहे.
विदर्भाच्या प्रवेशद्वारी नळगंगा नदीचे पात्र जलपर्णी वनस्पतीच्या वेढ्यात सापडले असून यामुळे नदीकाठच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. ही जलपर्णी वनस्पती मानवी आरोग्यास धोकादायक असून या वनस्पतीमुळे नदी पात्राच्या आजू-बाजूला वसलेल्या सालीपुरा, काशीपुरा, दुर्गानगर, भीमनगर, माता महाकाली नगर, बारादरी, मोहनपुरा अशा विविध भागात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढून जंतू पसरले होते. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. त्याचप्रमाणे ही वनस्पती विषारी असून पाणी संपविण्याचे काम करते.
या जलपर्णी वनस्पतीचे बियाणे पावसाळ्यापुर्वी वाढत गेल्यास मलकापूर शहराला व ग्रामीण भागातील ३८ गावांसाठीच्या नळयोजना कार्यान्वीत असलेल्या पुणार्माय नदीपात्रापर्यंत जावून याचा परिणाम या पाणी पुरवठा योजनांवर होवून ही पाणी संपविणारी वनस्पती आरोग्यास हानीकारक ठरू शकते. तसेच नळगंगा नदीचे पात्र जलपर्णी वनस्पतीने व्यापल्याने नदीकाठच्या परिसरातील गुराढोरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न उपस्थित झाला होता. त्यामुळे नागरिकांच्या हितास्तव प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ३ मे रोजी न.प. प्रशासनाला निवेदन देवून सदरची जलपर्णी वनस्पती तात्काळ काढण्यात यावी, अन्यथा २७ मे पासून अन्नत्याग आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला होता.
सदर निवेदनाची न.प. प्रशासनाने तात्काळ दखल घेत नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांनी या भागाची पाहणी करीत नदीपात्रातील जलपर्णी वनस्पती काढण्याच्या कामाला आज १२ मे पासून प्रत्यक्षात सुरूवात केली. या सुरू असलेल्या कामाची पाहणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अजय टप, बलराम बावस्कार, अनिल पाटील आदींनी केली.
‘लोकमत’ने सर्वप्रथम वेधलं लक्ष..!
मलकापूरातील नळगंगा नदीच्या पात्रात जलपर्णी वनस्पतींचा वेढा या विषयावर लोकमतने सर्वप्रथम लक्ष वेधले होते.त्या नंतरच्या काळात प्रहारने वारंवार पाठपुरावा केल्याने पालिका प्रशासनाने अखेर आज जलपर्णी वनस्पती नष्ट करण्यास सुरुवात केली आहे.