‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलला एक कोटी रुपयांचा फटका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 12:26 PM2019-07-19T12:26:46+5:302019-07-19T12:26:50+5:30
बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे विस्तारीकरण करताना जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून गुरूवारी बीएसएनएलचे दूरध्वनी वाहक ताब्यांचे केबल तोडण्यात आले. त्यामुळे बीएसएनलचे सर्व्हर तब्बल १८ तास बंद होते. परिणामी, बीएसएनएलचे सुमारे १ कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची तक्रार शहर पोलिसांत करण्यात आली.
शहरातून जाणाºया राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ च्या विस्तारीकरणाच्या कामास गत सात महिन्यांपासून सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणाच्या अख्यारित ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत करण्यात येत आहे. दरम्यान, प्रारंभी या कंपनीकडून मोजणी न करताच रस्त्याचा कामास सुरूवात करण्यात आली. लगेचच सेंटर लाईन सोडून रस्त्याची संरचना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर खामगाव नगर पालिकेच्या पाणी पुरवठ्याची पाईपलाईन दाबण्यात आली. त्यामुळे नगर पालिका प्रशासन आणि भूमिअभिलेख विभागाकडून कंत्राटदारास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. दरम्यान, बुधवारी सायंकाळपासून ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीकडून शहरातील रस्त्याच्या खोदकामास सुरूवात करण्यात आली. यामध्ये बीएसएनएलचे ताब्यांचे केबल, आॅप्टीकल केबल, सिमेंट क्रॉकीट आणि लोखंडाने बांधलेले डक्ट उध्वस्त केले. परिणामी, बीएसएनएलची संपूर्ण दूरध्वनी यंत्रणा कोलमडली. (प्रतिनिधी)
बीएसएनएलची सेवा ठप्प!
राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणाचे काम करणाºया जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केबल आणि तत्सम साहित्याची नासधूस करण्यात आली. त्यामुळे बुधवारी रात्रीपासूनच बीएसएनएलची टेलिफोन, मोबाईल आणि इंटरनेट सेवा ठप्प झाली. परिमाणी, खामगाव शहर आणि परिसरातील बँका आणि इंटरनेटशी संबधित विविध कार्यालयांचे कामकाज प्रभावित झाले होते.
नुकसान भरपाईची मागणी!
जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीकडून बीएसएनएलच्या नुकसानीची भरपाई मिळावी तसेच पुढील नुकसान टाळण्यासाठी सुरक्षा प्रदान करून याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची मागणी बीएसएनएलकडून पोलिस प्रशासनाकडे करण्यात आली.