‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला सव्वा लाखाचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2020 12:01 PM2020-11-11T12:01:33+5:302020-11-11T12:04:08+5:30
शेत जमिनीचा अकृषक म्हणून वापर केल्याप्रकरणी ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक लक्ष वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या विस्तारीकरणासाठी रोहणा शिवारातील एका शेत जमिनीचा अकृषक म्हणून वापर केल्याप्रकरणी ‘जान्दू’ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक लक्ष वीस हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. खामगाव महसूल विभागाने हा महत्वपूर्ण आदेश मंगळवारी दिला आहे. या आदेशामुळे ‘जान्दू’च्या व्यवस्थापनात एकच खळबळ उडाली आहे. खामगाव-बुलडाणा-अजिंठा महामार्गाच्या विस्तारीकरणाचा कंत्राट हिमाचल प्रदेशातील जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आला. या कंपनीकडून अजिंठा राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणास प्रारंभ करण्यात आल्यानंतर रोहणा शिवारातील गट नं.९२ क्षेत्र ०३.१२ हे.आर जमिनीपैकी ०१.२० हे.आर जमिनीचा म्हणजेच १२००० चौ.मि. मधील जमिनीचा अकृषक म्हणून विना परवानगी वापर सुरू केला. अकृषक जमिनीवर मोबाईल डांबर प्लॉन्ट उभा करण्यात आला. याप्रकरणी तलाठी रोहणा यांनी २१ सप्टेंबर २०२० रोजी सादर केलेल्या अहवालावरून गत सहामहीन्यांपासून शेत जमिनीचा अनधिकृत अकृषक वापर वाणिज्यिक प्रयोजनासाठी सुरू केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जान्दू कन्स्ट्रक्शन कंपनीला १ लक्ष रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. नायब तहसीलदार भारत किटे यांनी हा आदेश दिला.