जीवरक्षा बोट बनली जलपर्यटनाची आकर्षण बिंदू!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:14 AM2017-08-26T00:14:06+5:302017-08-26T00:14:50+5:30
गुजरातमधील आलंग समुद्रतटावर आशियातील सर्वात मोठय़ा शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील जीवरक्षा बोट सध्या विवेकानंद आश्रमनिर्मित विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरा आश्रम: गुजरातमधील आलंग समुद्रतटावर आशियातील सर्वात मोठय़ा शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील जीवरक्षा बोट सध्या विवेकानंद आश्रमनिर्मित विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे.
शुकदास महाराज यांचे विवेकानंद स्मारकनिर्मिती हे भव्य स्वप्न होते. या स्मारकाच्या निर्मितीसाठी विवेकानंद आश्रमाचे विश्वस्त मंडळ झपाटून कामाला लागले असून, त्यासाठी किमान १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून हे स्मारक पूर्ण होणार असून, सध्या त्याचे १0 टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. स्वामी विवेकानंद यांच्या अस्तित्वाची जाणीव या स्मारकावर व्हावी, त्यांच्या वैचारिक व अध्यात्मिक सहवासाचा अनुभव व्हावा, तद्व तच मनशांती लाभावी, यासाठी हे स्मारक लाखो जीवांसाठी आकर्षणस्थळ राहील, अशी अपेक्षा शुकदास महाराजांनी व्यक्त केली होती. त्या अपेक्षापूर्तीसाठी सध्या प्रयत्न सुरू असून, विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१0 टक्के काम पूर्णत्वास!
कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर कोराडी जलाशयात विवेकानंद स्मारक असावे, अशी शुकदास महाराजांची इच्छा होती. तशा प्रकारची कलाकृती स्वत:च महाराजांनी सुचविली होती. या कलाकृतीनुसार सध्या काम सुरू आहे. पर्यटकांसाठी उत्तम निवास व भोजन व्यवस्था, जलपर्यटन, स्मारकावर ध्यानमंडप व स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्मिक, वैचारिक साहित्याची शोभिका, विविध अत्याधुनिक साधनांची उ पलब्धता व त्याद्वारे विवेकानंदांच्या विचार व कार्याचा प्रचार-प्रसार येथे निर्माणाधीन आहे. जगभरातून पर्यटक व भाविक येण्याची श क्यता गृहीत धरता, स्मारकनिर्मितीसाठी विविध तज्जञांचा सल्लाही विवेकानंद आश्रमाच्या विश्वस्त मंडळातर्फे घेतला जात आहे. या संपूर्ण स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या दहा टक्के काम पूर्णत्वास गेले असून, त्यासाठी पाच कोटींपेक्षा अधिक खर्च विवेकानंद आश्रमास आलेला आहे.
एकाच वेळी २२ प्रवासी घेऊ शकणार नौकायनाचा आनंद!
गुजरातच्या समुद्रतटावर असलेले आलंग हे आशियातील मोडीत निघालेली जहाजे पुनर्वापरसाठी तयार करणे किंवा त्यातील लोखंड वेगळे काढण्याचे मोठे केंद्र आहे. वर्षाकाठी तेथे सरासरी ६९ मोठी जहाजे मोडीत काढली जातात. या जहाजावर जीवरक्षा बोटी ठेवलेल्या असतात. त्यांचा आपत्कालीन परिस्थिती वगळता फारसा वापर होत नाही. त्यामुळे त्या अगदी सुस्थितीत असतात. एकाच वेळी २२ प्रवासी वाहून नेण्याची आणि कोणत्याही स्थितीत जलवाहतूक करण्याची या बोटींची क्षमता आहे. अशा प्रकारची नवीन बोट घ्यायची असेल तर दहा ते बारा लाखांचा खर्च येतो; परंतु भंगारात निघालेल्या जहाजावरील चांगल्यात चांगली बोट ही दीड ते दोन लाखापर्यंत मिळते. विवेकानंद आश्रमाने नुकतीच अशीच एक बोट दीड लाखापर्यंत विकत घेऊन ती कोराडी जलाशयात तैनात केली आहे. या जलाशयात विवेकानंद स्मारक मूर्तरूप घेत असून, या स्मारकाच्या भेटीसाठी पर्यटकांची मोठी गर्दीही वाढली आहे. या पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद या बोटीद्वारे मिळत आहे.