जीवन अमृत सेवा -ब्लड ऑन कॉल योजनेला मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:35 AM2021-07-31T04:35:18+5:302021-07-31T04:35:18+5:30
बुलडाणा : राज्यातील शासकीय/खासगी रुग्णालयात दाखल रुग्णास रक्त मिळण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होऊ नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून ...
बुलडाणा : राज्यातील शासकीय/खासगी रुग्णालयात दाखल रुग्णास रक्त मिळण्यासाठी नातेवाईकांची धावपळ होऊ नये म्हणून राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून ब्लड ऑन कॉल ही योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या विषयीचा शासन आदेश २७ जुलै रोजी काढण्यात आला आहे.
जीवन अमृत सेवा ब्लड ऑन काॅल ही अभिनव याेजनेंतर्गंत शासकीय जिल्हा रक्तपेढ्यांनी जिल्ह्यातील अशासकीय रक्तपेढ्यासाेबत सामंजरस्य करार करण्यास शासनाने १५ मार्च राेजी मान्यता दिली हाेती. या शासननिर्णयानुसार याेजनेचा कालावधी ३० जून राेजी संपला आहे. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेमुळे घालण्यात आलेल्या निर्बंधामुळे याेजनेच्या अंमलबजावणी मर्यादा आली आहे. त्यामुळे या याेजनेस ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही याेजना प्रायाेगिक तत्तावर सुरू राहणार आहे. तसेच जिल्हा रक्तपेढ्या, धर्मादाय संस्था संचालित रक्तपेढ्या, इंडियन रेडक्राॅस साेसायटी संचालित रक्तपेढ्या यांच्या सामंजस्य करारानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने तुलनात्मक अभ्यास करून त्याबाबतचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या १० तारखेपर्यंत शासनास सादर करावा लागणार आहे. त्यानंतर या याेजनेचा कालावधी संपुष्टात आल्यानंतर याेजनेचा पुनर्विलाेकन अहवाल राज्य रक्त संक्रमण परिषद यांना सादर करावा लागणार आहे. या याेजनेस मिळणारा प्रतिसाद पाहून पुढील काळासाठी याेजनेबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे शासननिर्णयात म्हटले आहे.