जिगाव प्रकल्प : सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे मिळणार सिंचनासाठी पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 04:41 PM2020-03-03T16:41:29+5:302020-03-03T16:41:47+5:30
सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.
- नीलेश जोशी
बुलडाणा: जिगाव प्रकल्पातंर्गत शेती सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारेच पाणी उपलब्ध करण्यात येणार असून २००८ नंतर वाल्मी (वॉटर अॅन्ड लॅन्ड मॅनेजमेंट इन्स्टीट्यूट, औरंगाबाद) यांनी केलेला अभ्यास व मध्यंतरी गठीत करण्यात आलेल्या चितळे समितीने प्रकल्पाच्या फेरनियोजनासंदर्भात दिलेल्या अहवालानंतरच याबाबीचा प्रकल्पातंर्गत अंतर्भाव करण्यात आला आहे. दरम्यान, नऊ सप्टेंबर २०१९ ला प्रकल्पाच्या १३ हजार ७४८ कोटी रुपयाच्या तृतीय सुधारीत प्रशासकीय मान्यता देतानांच ही अट टाकून त्यास अंतिम मान्यता देण्यात आली आहे.
प्रकल्पातंर्गतच्या १२ उपचास सिंचन योजनेतून कालव्याद्वारे जर एक लाख १६ हजार ५७० हेक्टरवर पाणी देण्याचा खर्च हा वर्षाकाठी ५० ते ६० कोटी रुपयांच्या घरात जात असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय जलआयोगाने प्रकल्पाला मान्यता देताना प्रकल्पावरून होणाºया सिंचनासाठी सुक्ष्म सिंचन प्रणालीचा वापर करण्याबाबत अट घातली होती. दरम्यान, त्यासंदर्भाने पर्यावरणीय अभ्यासही करण्यात आला असून सुक्ष्म सिंचन प्रणालीद्वारे शेती सिंचनास पाणी देण्यासाठी जवळपास सहा हजार ६६१ किमी लांबीच्या जलवाहिन्या (पाईपलाईन) टाकाव्या लागणार आहेत.
जिगाव प्रकल्पातंर्गतच्या लाभ क्षेत्रापैकी ५० टक्के क्षेत्र हे खारपाणपट्यात येते तर उर्वरित ५० टक्के क्षेत्रापैकी बहुतांश भाग हा अवर्षण प्रवण आहे. प्रामुख्याने खामगाव तालुक्यातील पट्टा यात आहे. परिणामी कालव्याद्वारे पाणी दिल्या गेल्यास जमीनीचे खारपण वाढण्यासोबतच पाण्याचा अपव्यय होण्याची भिती होती. त्यामुळे जमीन अकृषक होऊन तिला पूर्वस्थिती आणण्यासाठीचा खर्चही अधिक येऊन येथे विविध पर्यावरणीय प्रश्न निर्माण झाले असते. त्या पार्श्वभूमीवर वाल्मी संस्थेला निमंत्रीत करून या भागातील पिक पद्धती, येथे कोणती पिके घेतल्या जावू शकतात व पाण्याची उपलब्धता झाल्यानंतर कोणती पिके येथे घेतल्या जावू शकतात. याचा अभ्यास करण्यात येऊन सुक्ष्म सिंचन प्रणालीतंर्गतच शेती सिंचन या प्रकल्पातंर्गत अंतर्भूत करण्यात आले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.