जिजामाता सहकारी साखर कारखाना पुन्हा विक्रीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 11:13 AM2021-03-06T11:13:24+5:302021-03-06T11:13:31+5:30
Jijamata Cooperative Sugar Factory for sold सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : विदर्भातील पहिल्या व तोट्यात गेलेल्या सिंदखेड राजा तालुक्यातील जिजामाता सहकारी साखर कारखाना राज्य सहकारी बँकेने विक्रीस काढला असून, २००२ पासून अवसायकांच्या ताब्यात असलेल्या या कारखान्याची देणी ही ७९ कोटींच्या घरात गेली आहेत.
हा कारखाना पुन्हा कार्यान्वित व्हावा, यासाठी सर्वच राजकीय नेत्यांनी प्रयत्न चालवले होते. मात्र हा कारखाना प्रत्यक्षात कार्यान्वित होऊ शकला नव्हता. हा कारखाना स्थापन होऊन आज ४९ वर्षे झाली आहेत. १२०० मेट्रीक टन गाळपक्षमता असलेल्या या कारखान्याचा पहिला गळीत हंगाम १९७२-७३ मध्ये झाला होता. मात्र अनेक कारणांनी हा कारखाना डबघाईस आला होता. त्यामुळे सरफेशी ॲक्टअंतर्गत या कारखान्याची सध्याची मालमत्ता, यंत्रसामग्री व जवळपास ७१ हेक्टर जमिनीसह ७९ कोटी रुपयांच्या कर्जवसुलीसाठी विक्रीस काढण्यात आली. राज्य व केंद्र सरकारची देणी हा कारखाना फेडू शकलेला नाही.
१४ मार्च २००२ रोजी हा कारखाना अवसायनात काढण्यात आला होता. सध्या विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव आणि सिंदखेड राजाचे सहनिबंधक (सहकारी संस्था) आर. एल. हिवाळे हे सध्या या कारखान्याचे अवसायक म्हणून काम पाहात आहेत. केंद्र, राज्य व कामगारांची मिळून जवळपास २४ कोटी रुपयांपेक्षाही अधिक देणी देणे बाकी आहे.
आता हा कारखाना विक्रीस काढला असल्यामुळे नेमका तो कोण घेतो की, प्रत्यक्षात तो कार्यान्वित होऊ शकतो का? हा मूळ प्रश्न आहे. यापूर्वी हा कारखाना भाडेतत्त्वावर काहींना चालवायलाही दिला गेला होता. मात्र नंतर पुन्हा तो बंद पडला होता. आता राज्य सहकारी बँकेने पुन्हा हा कारखाना विक्री करण्यासाठी काढला आहे. येथील यंत्रसामुग्रीहीची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे हा कारखाना कोण घेणार याकडे लक्ष लागून आहे.
महिन्याभरात कामगारांची मिळणार देणी
कारखान्याने बनविलेल्या ५२ हजार क्विंटल साखरेपैकी १४ हजार ५०० क्विंटल साखरेच्या विक्रीतून मिळालेल्या ३ कोटी ३६ लाख रुपयातून सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ८३६ कामगारांची देणी ‘प्रथम हक्क’ तत्त्वानुसार देण्यात येणार आहेत. त्यादृष्टीने सध्या कारखान्याचे अवसायक प्रयत्नशील आहेत. राज्य सहकारी बँकेने या साखर विक्रीतून प्राप्त झालेली ३ कोटी ३६ लाख रुपयांची रक्कम (व्याजासह) अवसायकांच्या खात्यात जमा केली आहे. ‘प्रो-डाटा बेसीस’ तत्त्वानुसार ही देणी कामगारांना येत्या काळात देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. अवसायकांकडून सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर-ऑक्टोबर २०२० मध्ये दिलेल्या आदेशानुसार आता ही कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात जिजामाता सहकारी साखर कारखान्याच्या कामगारांनी त्यांच्या थकित वेतनासाठी थेट जिल्हा उपनिबंधक कार्यालयातच चार ते पाच दिवस रांत्रदिवस ठिय्या दिला होता. त्यानंतर या हालचाली सुरू झाल्या आहेत.