जिजामाता विद्यालयाचे विद्यार्थी घेणार आधुनिक कृषी शिक्षणाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:14 AM2021-09-02T05:14:21+5:302021-09-02T05:14:21+5:30
भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (फाली) हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ...
भारताच्या कृषी क्षेत्रातील भविष्याचे नायक (फाली) हा उपक्रम चालू शैक्षणिक वर्षापासून कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शेती, तंत्रज्ञानाची आणि कृषी व्यवसायाची आवड निर्माण व्हावी म्हणून शिक्षण दिले जाणार आहे.
यामध्ये परस्परसंवादी अध्ययन, विविध प्रकारची प्रात्यक्षिके जसे की, मातीपरीक्षण, दूधपरीक्षण याचबरोबर प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थी शाळेत उभारण्यात येणाऱ्या शेडनेटमध्ये विविध प्रकारच्या भाजीपाला व फुले यांचे उत्पादन घेणार आहेत.
प्रकल्पाच्या माध्यमातून कृषी विज्ञान, पशू विज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन या विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना अवगत होणार आहे. त्याचबरोबर विविध विषयांच्या प्रक्षेत्र भेटीच्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे, तसेच फाली प्रकल्पाच्या वार्षिक संमेलनासाठी विद्यालयातील काही विद्यार्थ्यांची निवड करून ते विद्यार्थी जळगाव येथे असलेल्या जैन इरिगेशन सिस्टम कंपनीला भेट देणार आहेत. या वार्षिक संमेलनामध्ये विद्यार्थ्यांच्या कृषी व्यवसाय नियोजन व नावीन्यपूर्ण मॉडेल बनवण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात.
अमोल काकडे व प्रदीप गरकळ यांच्या मार्गदर्शनाखाली विषय शिक्षक अभिजित तिडके यांनी नुकतेच विद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रकल्प अभ्यासक्रमाची पुस्तिका व इतर साहित्याचे वाटप शाळेचे मुख्याध्यापक रमेश ठोसरे, बाबूराव साबळे, रमेश दंदाले, वसंत पाटील, शिवशंकर मखमले, देवीदास खिल्लारे, दीपक नागरे, कुंवरसिंग चव्हाण, संदीप निलख, राजेंद्र पडघान, अशोक गवई, पुरुषोत्तम मानतकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील १३५ शाळांमध्ये हा प्रकल्प जैन ठिबक, गोदरेज एग्रोवेट, यूपीएल, बायर, स्टार ॲग्री यांच्या सहकार्यातून चालवला जातो. प्रकल्पामध्ये आठवी व नववीच्या विद्यार्थ्यांना कृषी शिक्षणाचे धडे दिले जातात.