माणुसकी धर्माच्या जपणुकीसाठी ‘जिजाऊच्या लेकीची धडपड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2021 07:33 PM2021-03-24T19:33:57+5:302021-03-24T19:34:09+5:30
khamgaon News सृजनशील उपक्रमाला आणि पुढाकाराला खामगावातील सर्व जाती-धर्मातील युवकांचा प्रतिसाद मिळत आहे.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: ‘थोर महात्मे होऊन गेले...चरित्र त्यांचे पहा जरा...आपण त्यांच्या समान व्हावे...हाच सापडे बोध खरा!’ उपरोक्त ओळींचा प्रत्यय आपल्या जीवनात अंगीकारत, खामगाव येथील एका जिजाऊच्या लेकीची जाती-धर्माच्या भींती तोडण्यासाठी धडपड सुरू आहे. ‘तिच्या’ सृजनशील उपक्रमाला आणि पुढाकाराला खामगावातील सर्व जाती-धर्मातील युवकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे खामगावात ‘रक्त’नात्याच्या धर्माची जपणूक होताना दिसत असल्याचे सकारात्मक चित्र आहे.
समाजातील जातीच्या भींती पाडायच्या असतील तर ‘रक्ता’च्या नात्याची निर्मिती होणं गरजेचं आहे. हाच धागा पकडत खामगाव येथील राजर्षी दिलीप पाटील या ध्येयवेड्या महिलेने समाजातील वाईट मार्गाला लागलेल्या आणि भांडखोर स्वभाव असलेल्या सर्व जाती धर्मातील युवकांशी संपर्क केला. खामगाव उपजिल्हा सामान्य रूग्णालयात असलेल्या रक्तपेढीतील रक्ताचा तुटवडा भरून करण्यासाठी खारीचा वाटा उचलला. सुरूवातीचे काही वर्ष तिच्या नशीबी अपयश आले. मात्र, सातवर्षांपूर्वी मुस्लिम...बौध्द...आणि हिंदू समाजातील काही युवकांना तिचं म्हणणं पटलं. या युवकांनी ‘रक्त’धर्माच्या निर्मितीत पुढाकार घेतला.
‘हीच आमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे...माणसाने माणसाशी माणसासम वागणे’...‘हर एक जाती को ब्लड बॅक एक कर देती है!... हर एक जाती का बंदा यहापर ‘खुदा’ बन जाता है!!’ या ओळी कृतीत उतरविल्या. रक्तधर्माच्या प्रचार, प्रसाराठी जीवतोडून पुढाकार घेतला. त्यामुळे खामगाव आणि परिसरातील सिकलसेल आणि थॅलेसीमिया ग्रस्त रूग्णांची रक्ताची निकड कमी होण्यास मदत झाली.
समाजातील वंचित, उपेक्षीत आणि गरजवंत रूग्णांना रक्ताची मदत करण्याचे भाग्य लाभतेय. त्यांच्या निरंतर सेवेत ‘तरूणाई’ची साथ असल्याचा अभिमान आहे.
- राजश्री पाटील
खामगाव.