जॉबकार्ड, आधार जोडणीत जिल्हा अव्वल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 01:20 AM2017-11-15T01:20:26+5:302017-11-15T01:20:40+5:30
थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने मनरेगामध्ये काम करणार्या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : थेट मजुरांच्या खात्यात त्यांची मजुरी जमा होण्याच्या दृष्टीने मनरेगामध्ये काम करणार्या मजुरांचे जॉब कार्ड, आधारकार्ड त्यांच्या बँक खा त्याशी लिंक करण्यामध्ये बुलडाणा जिल्हा राज्यात अव्वल ठरला आहे.
दोन वर्षांपूर्वी मनरेगावरील मजुरी न मिळाल्याने तथा फसवणूक झाल्याने बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुका पाच मजुरांच्या आत्महत्यांमुळे राज्यात चर्चेत आला होता. त्यामुळे लोणार तालुक्यात ओडीसा आणि ठाणे येथील संस्थांनी केंद्राच्या निर्देशानंतर येऊन थेट सामाजिक अंकेक्षणही करीत तब्बल १७ हजार मजुरांचे अर्जही भरून घेतले होते. या कटू अनुभवातून बाहेर पडत आजच्या तारखेत बुलडाणा जिल्हा राज्यात जॉब कार्ड, आधार कार्ड थेट मजुरांच्या बँक खात्यांशी लिंक करण्यात राज्यात पहिल्या क्रमांकावर आहे. ९९.७४ टक्के मजुरांचे आधार कार्ड आणि जॉब कार्ड लिंक होऊन बँक खात्याशी जोडले गेले आहेत.
मनरेगांतर्गत बुलडाणा जिल्ह्यात एक लाख ३३ हजार ४८८ मजुरांनी नोंदणी केलेली आहे. यापैकी एक लाख २१ हजार ८४७ मजुरांचे आधार कार्डची पड ताळणी झाली आहे. एक लाख दोन हजार ९१३ मजुरांच्या आधारकार्ड, जॉबकार्ड आणि बँक खात्याचे लिंकिंग झालेले आहे.
त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील मजुरांच्या थेट खात्यात त्यांची मजुरी जमा होत आहे. वर्तमान स्थितीत मनरेगांतर्गत २0१ रुपये मजुरी दिली जाते. तिन्ही बाबींची लिंकींग झाल्यामुळे थेट मजुराच्या खात्यात त्याची मजुरी पडत असल्याने त्याची फसवणूक होण्याचा धोका टाळण्यास मदत मिळत आहे.
पुढारलेले जिल्हे मागे
मजुरांचे जॉबकार्ड, आधार आणि बँक खाते लिंक करण्याच्या बाबतीत राज्यातील पुढारलेले जिल्हे मागे आहेत. विदर्भातील यवतमाळ जिल्हा हा याबाबत सध्या दुसर्या तर नागपूर जिल्हा तिसर्या क्रमांकावर आहे. अकोला जिल्हा हा चौथ्या क्रमांकावर आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, पालघर, रायगड आणि बुलडाणा जिल्ह्यालगतचा जालना जिल्हा तळाकडून अनुक्रमे पहिले, दुसरे, तिसरे, चौथे आणि पाचवे आहेत.
मजुरांचे स्थलांतर समस्या
बुलडाणा जिल्ह्यात प्रामुख्याने लोणार या मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या तालुक्यातून मोठय़ा प्रमाणावर औरंगाबाद, सुरत, मुंबई, ठाणे या भागात स्थलांतर पूर्वी होत होते. जादा मजुरी औद्योगिक क्षेत्रात मिळत, म्हणून येथील मजूर प्रामुख्याने त्या भागात जातात;परंतु अलिकडील काळात त्यात आता कमी आली आहे. सामाजिक अंकेक्षण आणि काम ‘दो फॉर्म’ भरल्यानंतर या स्थितीत बर्यापैकी फरक पडल्याचे चित्र आहे.