राजकीय, सामाजिक समीकरणांची सांगड घालत मातृतिर्थाचा विकास घडवू - राजेंद्र शिंगणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 03:09 PM2020-01-13T15:09:52+5:302020-01-13T15:09:59+5:30
राजकीय समीकरणाचा सामाजिक समीकरणाशी सांगड घालून मातृतिर्थाचा विकास घडवून आणू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा: राजकीय समीकरण ज्या प्रमाणे राज्यात जुळले तेच समीकरण बुलडाणा जिल्ह्यात जुळले असून या राजकीय समीकरणाचा सामाजिक समीकरणाशी सांगड घालून मातृतिर्थाचा विकास घडवून आणू असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी दिले.
पंचायत समितीमध्ये आयोजित शासकिय कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्षा मनिषा नितीन पवार होत्या. उदघाटक म्हणून कमलबाई जालिंधर बुधवत उपस्थित होत्या. प्रमूख अतिथी म्हणून कृषी सभापती दिनकरराव देशमूख, जि. प. सदस्य राम जाधव, जि. प. सदस्य सरस्वती वाघ, जि. प. सदस्य पुनम. राठोड, जि. प. सदस्य सिंदूबाई खंडारे , सभापती नंदिनी देशमूख, उपसभापती लता खरात, पं. स. सदस्य राजू ठोके, उज्वला युवराज नागरे, अश्विनी बोडखे, मीना गजानन बंगाळे, दीपा सुखा राठोड, संतोष आडे, शिक्षणाधिकारी खान, तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. जिजाऊ जन्मस्थळाच्या विकासासाठी महाराष्ट्र शासनाने ३११ कोटींचा विकास आराखडा मंजूर केला आहे. या विकास आराखड्यातील कामासाठी महाविकास आघाडीचे सरकार कटीबद्ध आहे. जास्तीत जास्त कामे लवकरात लवकर कसे होतील यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुंख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न करू असे अश्वासन यावेळी त्यांनी दिले. यावेळी डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सर्वप्रथम जिजाऊ माँ साहेबांचे पुजन करून अभिवादन केले. त्यानंतर सर्वच उपस्थित मान्यवरांनी पुजन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गटविकास अधिकारी शिंदे, गटशिक्षणाधिकारी दादाराव मुसदवाले, प्रवीण गिते, भानुदास लव्हाळे यांनी प्रयत्न केले.
(तालुका प्रतिनिधी)