बड्या ठेकेदाराच्या भल्यासाठीच एकत्रित निविदेचा घाट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:36 AM2021-05-19T04:36:04+5:302021-05-19T04:36:04+5:30
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात रवीकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची प्रत्यक्ष भेट घेतली. स्वतंत्र निविदा न काढता क्लब टेंडर ...
शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांसंदर्भात रवीकांत तुपकर यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांची प्रत्यक्ष भेट घेतली. स्वतंत्र निविदा न काढता क्लब टेंडर काढण्यामागे जि. प. बांधकाम विभागाचे मुख्य कार्यकारी अभियंता आर. बी. परदेशी यांचा काय उद्देश असू शकतो, क्लब टेंडर काढण्याचाच अट्टाहास का? असे प्रश्न तुपकरांनी जिल्हाधिकाऱ्यांसमोर उपस्थित केले. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत प्रशासकीय मंजुरी दिलेली कामे कार्यान्वित करताना गुणवत्तापूर्वक व विहीत मुदतीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यासाठी एकत्रित निविदा न काढता स्वतंत्रपणे प्रत्येक रस्त्याची निविदा काढण्याविषयी रवीकांत तुपकर यांनी यापूर्वीच मागणी केली होती. २०२०-२१ मध्ये मंजूर पाणंद रस्त्याच्या कामास एप्रिल २०२१ मध्ये सुरुवात होणे अपेक्षित असताना जि. प. बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. बी. परदेशी यांनी पाणंद रस्त्याची कामे सुरू करण्यास दिरंगाई केली. सर्व पाणंद रस्त्याच्या कामाच्या स्वतंत्र निविदा बोलाविण्यात आल्या असत्या तर आतापर्यंत मंजूर सर्व रस्ते तयार झाले असते, असेही तुपकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून देत यासंदर्भाने निवेदन दिले.
जवळच्या व्यक्तीला काम देण्याचा खटाटोप
परदेशी यांनी देऊळगावराजा व सिंदखेडराजा तालुक्यासाठी स्वतंत्र निविदा बोलाविल्या त्यादेखील १२ व १९ मे रोजी. मग, चिखली मतदारसंघातीलच रस्त्यांचे एकत्रित टेंडर काढण्यामागे त्यांचा हेतू जवळच्या व्यक्तीला कामे मिळण्याचा असल्याचा आरोप तुपकरांनी केला.
...तर पावसाळ्यापूर्वी होतील कामे पूर्ण
प्रत्येक पाणंद रस्त्याचे स्वतंत्र टेंडर काढल्यास अनेक बेरोजगार अभियंते, मजूर, कामगार, सहकारी संस्थांना काम मिळणार आहे. एकत्र टेंडर निघाल्यास केवळ एकाच व्यक्तीचे भले होईल आणि वेळेत कामे होणार नाही. एक ठेकेदार एवढी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करू शकणार नाही. या घोळात शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यास आंदोलनाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही तुपकर यांनी प्रशासनास दिला आहे.