पत्रकारांनी समाजातील सकारात्मक बाजू जगासमोर मांडावी : राजेश राजोरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:52 AM2021-01-08T05:52:57+5:302021-01-08T05:52:57+5:30
पत्रकार दिनाच्या औचित्याने ६ जानेवारी रोजी चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक श्रीराम नागरी पतसंस्थेच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये ज्येष्ठ ...
पत्रकार दिनाच्या औचित्याने ६ जानेवारी रोजी चिखली तालुका पत्रकार संघाच्या वतीने स्थानिक श्रीराम नागरी पतसंस्थेच्या राजमाता जिजाऊ सभागृहामध्ये ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे यांचे ‘आजची पत्रकारिता’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पत्रकारसंघाचे माजी अध्यक्ष सुधीर चेके पाटील होते, तर प्रमुख उपस्थितीत श्रीराम नागरी पतसंस्थेचे अध्यक्ष पंडितराव देशमुख, ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब पळसकर, पत्रकारसंघाचे अध्यक्ष उद्धव थुट्टे पाटील, राजा खान होते. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब असून त्याग, सेवा, समर्पण ही पत्रकारितेतील शाश्वत मूल्ये आहेत. काळाच्या बदलत्या प्रवाहात पत्रकारितेमध्ये नवनवीन प्रकार आले. मात्र जोपर्यंत छापून आलेल्या बातमीवर लोकांचा विश्वास आहे, तोपर्यंत ‘प्रिंट मीडिया’ला काळजीचे कारण नाही, असे मतही राजेश राजोरे यांनी मांडले. सोबतच बातमी लिहिताना पत्रकारांनी न्यायाधीशांची भूमिका न ठेवता, जनतेचा वकील या नात्याने बाजू मांडण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले. अध्यक्षीय मनोगतात सुधीर चेके पाटील यांनी पत्रकार म्हणून समाजात वावरत असताना आपले आचरण आदर्श असले पाहिजे, असे सांगितले. पत्रकारांना भेडसावत असलेल्या अडी-अडचणी, समस्या यांबाबत उहापोह केला. याप्रसंगी ज्येष्ठ पत्रकार नानासाहेब पळसकर, पंडितराव देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. राजेश राजोरे यांनी उपस्थित पत्रकारांशी संवाद साधून विविध प्रश्नांची उत्तरे दिली. प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष उद्धव थुट्टे पाटील यांनी केले. परिचय समाधान गाडेकर, सूत्रसंचालन युसुफ शेख यांनी केले, आभार सांस्कृतिक विभागप्रमुख पवनकुमार लढ्ढा यांनी मानले. कार्यक्रमाला शहर व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते.