शेतकरीपुत्र झाला न्यायाधीश
By admin | Published: March 14, 2016 01:48 AM2016-03-14T01:48:01+5:302016-03-14T01:48:01+5:30
प्रतिकूल परिस्थितीवर मात करून अल्पभूधारक शेतक री पुत्राची यशोगाथा.
मयूर गोलेच्छा /लोणार
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती सातत्याने तोट्यात येत असून, अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविताना शेतकर्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. एकीकडे मुलांचे शिक्षण, लग्न, वाढते कर्ज अशा संकटात जगणे असह्य झाल्यामुळे जिथे काही शेतकर्यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्याच ठिकाणी तालुक्यातील धायफळ येथील अल्पभूधारक शेतकरी सत्यभान मानकर यांच्या मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या न्यायाधीश पदाच्या परीक्षेत यश मिळविले आहे. त्या मुलाचे नाव आहे, रवी सत्यभान मानकर.
लोणार तालुक्यातील धायफळ येथील सत्यभान धारोजी मानकर यांच्याकडे ५ एकर जमीन असून, ती कोरडवाहू आहे. त्यामुळे जमिनीतून फार काही उत्पादन होत नाही. घरची परिस्थिती हलाखीची असताना त्यांनी मुलांच्या शिक्षणावर भर दिला. सत्यभान मानकर यांना वसंता आणि रवी ही दोन मुले. दोघांचेही प्राथमिक शिक्षण गावातील जि.प. शाळेत व त्यानंतरचे शिक्षण लोणार येथील महाराणा प्रताप हायस्कूलमध्ये पूर्ण झाले. रवी हा अभ्यासात हुशार होता. परंतु, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने रवीच्या भावाने आपले शिक्षण थांबविले आणि लहान भावाला पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर लॉ विद्यापीठात पाठविले. यावेळी रवीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी मोठय़ा भावाने सांभाळली. दरम्यान, वसंता याचे हृदयविकाराने निधन झाले. अशा परिस्थितीत न डगमगता मिळेल ते काम करून रवीने शिक्षण पूर्ण केले. तसेच लोकसेवा आयोगामार्फत न्यायाधीश पदाची परीक्षा दिली. त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाल्याने रवीची न्यायाधीश पदावर निवड झाली. मुलाच्या यशामुळे वडिलांच्या डोळय़ात एकीकडे आनंदाचे तर दुसरीकडे धाकट्या मुलाच्या आठवणीने दु:खाचे अश्रू तरळत होते.