‘ज्युली’ने लावला दिव्यांग महिलेच्या हत्येचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 03:53 PM2019-12-08T15:53:12+5:302019-12-08T15:59:20+5:30
श्वानाने घरातून बाहेर गल्लीत जात तीन घरे सोडून राहत असलेल्या रितेश गजानन देशमुख याच्या घाराचा रस्ता दाखवला. तेव्हा पोलिसांनी वेगाने हालचाल करत रितेश देशमुख यास ताब्यात घेतले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव जामोद: तालुक्यातील खेर्डा येथील दिव्यांग महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या प्रकरणात बुलडाणा पोलिस दलातील डॉग स्कॉडने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्युली नामक श्वानाने मृत महिलेच्या घराजवळच असलेल्या आरोपीच्या घराचा माग दाखवताच पोलिसांनी त्यास त्याब्यात घेतले.
रितेश गजानन देशमुख असे आरोपीचे नाव आहे. मृत महिलेच्या घरापासून अवघ्या तीन घरांच्या अंतरावरच तो राहत होता. सात डिसेंबर रोजी सकाळी खेर्डा येथील सुमारे ५२ वर्षीय महिलेचा निवस्त्र अवस्थेत ती राहत असलेल्या घरात मृतदेह आढळून आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी खेर्डा येथील पोलिस पाटील योगेश म्हसाळ यांनी जळगाव जामोद पोलिस ठाण्यात या घटनेची माहिती दिल्यानंतर संपूर्ण पोलिस दल हादरले होते. त्यानंतर लगोलग ठाणेदार सुनील जाधव यांनी खेर्डा गाठत घटनास्थळाची पाहणी केली होती. सोबतच घटनेचे गांभिर्य पाहता लगोलग वरिष्ठांना कल्पना देत श्वॉन पथक, फॉरेन्सिक सायन्स पथक आणि ठसे तज्ज्ञांना पाचारण केले होते.
दुपारी ही पथके खेर्डा येथे दाखल झाली. दरम्यान, ज्युली नामक श्वानास ज्या लाकडी राफ्टरने दिव्यांग महिलेस गंभीर मारहाण करून तिचा खून करण्यात आला होता त्याचा वास देण्यात आला. तेव्हा लगोलग श्वानाने घरातून बाहेर गल्लीत जात तीन घरे सोडून राहत असलेल्या रितेश गजानन देशमुख याच्या घाराचा रस्ता दाखवला. तेव्हा पोलिसांनी वेगाने हालचाल करत रितेश देशमुख यास ताब्यात घेतले. सोबतच त्याच्या कुटुंबियांनाही चौकशीसाठी जळगाव जामोद येथे नेले.
दुसरीकडे देशात उन्नाव आणि हैदराबाद प्रकरणानंतर महिला अत्याचाराच्या घडणाऱ्या घटना व त्याची संवेदनशीलता पाहता जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, खामगावचे पोलिस उप अधीक्षक हेमराज राजपूत, मलकापूरच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे, जळगाव जामोदचे ठाणेदार सुनील जाधव यांनी तातडीने खर्डा येथील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोबतच प्रकणाची कसून चौकशी सुरू केली होती. त्याचा खूनाचा उलगडा करण्यास मदत झाली. या प्रकरणी मृत महिलेच्या चुलत भावाने पोलिसात तक्रार दिली आहे.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील, शिवसेनेचे जळगाव जामोदचे तालुका प्रमुख गजानन वाघ तसेच धनगर समाज संघटनेच्या पदाधिकारी चंदा पुंडे यांनी खेर्डा येथे भेट देत जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. भुजबळ यांची भेट घेत प्रकरणातील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. सोबतच अशा घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची खंतही व्यक्त केली.
दिव्यांग अविवाहीत महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याच्या या घटनेनंतर संपूर्ण गावात पोलिस मोठ्या संख्येने दाखल झाले होते. सोबतच घटनास्थळाकडे स्थानिकाना जाण्यास मज्जावही करण्यात आला.
फॉरेन्सिक पथकानेही घेतले नमूने
दुपारी दीड वाजता डॉग स्कॉड मधील ज्युली नावाची कुत्री, ठसे तज्ज्ञ आणि फॉरेन्सिक सायन्स पथक हे घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने घटनास्थलावरील नमुनेही गोळा केले. यावेळी श्वानास घटनास्थळी पडलेल्या राफ्टरचा वास दिल्यानंतर त्याने थेट तीन घरे सोडून असलेल्या रितेश गजानन देशमुख याच्या घराचा रस्ता दाखवला. त्यामुळे रितेश देशमुखला पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आला. विशेष म्हणजे रात्री हे निर्घूण कृत्य करताना आरोपी रितेश देशमुख याने वापरलेले कपडे ही रात्रीच धुतले होते. श्वानाने थेट त्याचे घरत गाठत त्याचे हे कपडेही शोधल्याचे स्थानिकांनी सांगितले. फॉरेन्सिक सायन्स पथकानेही ते ताब्यात घेततले.
आरोपीच्या कुटुंबियांचीही चौकशी
पोलिसांनी रितेश देशमुख सह त्याची पत्नी, आई-वडील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून जळगाव जामोद पोलिस ठाण्यात त्यांची कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान रितेश देशमुख यानेही सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या पत्नीस आपणच दिव्यांग महिलेचा खून केल्याचे सांगितले असल्याचेही पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. आरोपी रितेश देशमुख याच्या दोन्ही हाताच्या बोटांसह शरीरावर काही ठिकाणी जखमा झाल्या असल्याचेही पोलिस तपासत समोर आले आहे.
शनिवारी रात्री उशिरा खेर्डा येथील स्मशान भूमीमध्ये ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये मृत दिव्यांग महिलेचा दफन विधी करण्यात आला. दुसरीकडे वृत्त लिहीपर्यंत शवविच्छेदन अहवाल पोलिस प्रशासनास प्राप्त झाला नव्हता. तो रविवारी मिळणार असल्याचे ठाणेदार सुनील जाधव यांनी सांगितले. जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयामध्ये तिच्या पार्थिवाचे शवविच्छेदन झाले.