अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय

By विवेक चांदुरकर | Published: May 16, 2024 10:21 AM2024-05-16T10:21:08+5:302024-05-16T10:21:31+5:30

अभयारण्यात ३१ पाणवठ्यांवर होणार प्राणी गणना, यंदा प्राणी प्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमाचा आनंद घेता येणार 

Jungle Safari in Ambabarwa Sanctuary will be closed for two days; Decision of wildlife department based on animal census | अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय

अंबाबरवा अभयारण्यात दोन दिवस बंद राहणार जंगल सफारी; प्राणी गणनेच्या पृष्ठभूमीवर वन्यजीव विभागाचा निर्णय

अझहर अली

लोकमत न्यूज नेटवर्क
संग्रामपूर:- सातपुडा पर्वत रांगेतील अंबाबरवा अभयारण्यात दि. २३ च्या दुपारपासून २४ मे च्या सकाळपर्यंत जंगल सफारी बंद राहणार आहे. २३ मे ला बुद्ध पोर्णीमेच्या रात्री अभयारण्यात निसर्ग अनुभव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याने २३ व २४ मे या दोन दिवसांसाठी जंगल सफारी बंद ठेवण्याचा निर्णय वन्यजीव विभागाने घेतला आहे. अभयारण्यात २३ मे च्या रात्री चंद्राच्या लखलख प्रकाशात वन्य प्राण्यांची गणना पार पडणार आहे. १९ बीट च्या. १५ हजार ८३९.७५ हेक्टर विस्तीर्ण क्षेत्रावरील वनात अंबाबरवा अभयारण्य आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पात समाविष्ट संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा वन परिक्षेत्र कार्यालय अंतर्गत अंबाबरवा अभयारण्यात वन्य प्राण्यांसह पक्ष्याची किलबिलाट पर्यटकांचे लक्ष वेधून आहेत. अंबाबरवा अभयारण्यात एकूण ५ वर्तूळ ,१९ बीट आहेत. निसर्ग अनुभव कार्यक्रमासाठी अभयारण्यात नैसर्गिक ७ तर कृत्रिम २४ असे एकूण ३१ पाणवठे आहेत. गेल्या वर्षी प्राणी प्रेमींना वन्यजीव विभागाकडून प्रवेश नाकारण्यात आला होता. मात्र यावर्षी १० पाणवठ्यावर प्रवेश देण्यात येणार असल्याने प्राणी प्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. तर ईतर ठिकाणी वन्यजीव विभागातील अधिकारी कर्मचारी वन्यप्राण्यांची गणना करणार आहे. त्यासाठी ३१ मचाण उभारण्यात आले असून त्यावर बसून प्राणी प्रेमींच्या उपस्थितीत प्राणी गणना पार पडणार आहे. प्रत्यक्ष नजरेत दिसून येणार्‍या वन्यजीवाची गणना महत्वाची ठरणार आहे. प्राणी गणनेसाठी १९ वनरक्षक, ४९ वनमजूर, ५ वनपाल कर्तव्यावर राहणार असल्याची माहिती वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाली आहे. 

ऑनलाइन बुकिंग सुरू

गतवर्षी प्राणी प्रेमींना निसर्ग अनुभव कार्यक्रमामध्ये बंदी घातली होती. यावर्षी मात्र त्यांना सहभागी होता येणार आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी प्राणी प्रेमींना १६ मे च्या दुपार पासून मेळघाट प्रकल्पाच्या सांकेतिक स्थळावर नोंदणी करता येणार आहे. 

सन २०२२ च्या तूलनेत गतवर्षी वन्य प्राण्यांनी कमी प्रमाणात दिले होते दर्शन

सन २०२२ मध्ये अंबाबरवा अभयारण्यात ८०१ वन्य प्राण्यांनी दर्शन दिले होते. यामध्ये ६ वाघ, ६ बिबट, १५ अस्वल, २ तडस, ७० नील गाय, ४९ सांबर, २८ भेडकी, ४८ गवा, १७२ रान डुक्कर, २ लंगूर, १५५ माकड, ११ म्हसण्या उद, ५४ रान कोंबडी, १ रान मांजर, १५१ मोर, १० ससा, १२ सायाळ, २ कोल्हा, ७ लांडगा असे एकूण ८०१ प्राण्यांची नोंद झाली होती. तर गतवर्षी सन २०२३ मध्ये वाघ ३, बिबट ३, अस्वल १२, नील गाय ५४, सांबर ३७, भेडकी १५, गवा ६४, रान डुक्कर ४८, लंगूर ५१, माकड ११६, रान कोंबडी २०, रान मांजर ३, मोर ८५, ससा ५, सायाळ १ असे एकूण ५१७ वन्य प्राण्यांची नोंद झाली आहे. सन २०२२ च्या तूलनेत गतवर्षी सन २०२३ मध्ये वन्य प्राण्यांनी कमी प्रमाणात दर्शन दिले होते. यंदा बुद्ध पौर्णिमेच्या रात्री पानवट्यांवर किती वन्यप्राण्यांचे दर्शन होणार याची उत्सुकता प्राणी प्रेमींना लागली आहे.

बुद्ध पौर्णिमेला अंबाबरवा अभयारण्यात प्राणी गणना पार पडणार आहे. निसर्ग अनुभव कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली असून २३ व २४ मे हे दोन दिवस जंगल सफारी बंद ठेवण्यात येणार आहे. यावर्षी वन्यप्रेमींना या कार्यक्रमांमध्ये सहभागी होता येणार असून त्यासाठी त्यांना ऑनलाईन बुकिंग करावी लागणार आहे. ऑनलाईन बुकिंग गूरूवारच्या दुपार पासून सुरू झाली आहे.

सुनील वाकोडे
वन परिक्षेत्र अधिकारी (वन्यजीव)
सोनाळा ता. संग्रामपुर

Web Title: Jungle Safari in Ambabarwa Sanctuary will be closed for two days; Decision of wildlife department based on animal census

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल