शौचालयासाठी जेसीबीद्वारे मोफत खड्डे
By admin | Published: March 13, 2017 02:29 AM2017-03-13T02:29:50+5:302017-03-13T02:29:50+5:30
न.प. उपाध्यक्ष ढमाळ यांचा स्तुत्य उपक्रम.
फहीम देशमुख
शेगाव, दि. १२- स्वच्छ महाराष्ट्र योजनेंतर्गत शासनाद्वारे वैयक्तिक शौचालयाकरिता १६ हजार रुपये अनुदान शासनाकडून मिळत असून या अनुदानात चांगले शौचालय व्हावे ही बाब लक्षात घेऊन न.प. उपाध्यक्ष वर्षा दीपक ढमाळ यांनी जेसीबीद्वारे प्रभाग १ मधील नागरिकांसाठी मोफत शौचालयाचे खड्डे खोदून देण्याचा निश्चय केला आहे. या मोफत खड्डे खोदण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून आतापर्यंंत प्रभागात अनेकांच्या शौचालयांचे खड्डे खोदल्या गेले आहे. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक ढमाळ हे उपस्थित होते.
हा खड्डा जेसीबीद्वारे खोदण्यासाठी किमान १ हजार रुपयापर्यंंत खर्च येत आहे. भविष्यातही प्रभाग १ मधील ज्याही नागरिकांना शौचालय बांधताना अनुदान कमी पडल्यास वर्षा दीपक ढमाळ ह्या स्व:खर्चाने खड्डा खोदून देणार आहेत. प्रभाग १ हा हगणदरीमुक्त करण्याचे आपले प्रयत्न असून त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे धमाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
वैयक्तिक शौचालयांची संख्या वाढणार
शेगाव नगरपालिकेतर्फे हद्दीतील वैयक्तिक शौचालयांसाठी १६ हजाराचे अनुदान वितरित केल्या जात आहे; मात्र अनेकांनी हा निधी फस्त केलेला असून न.प.ने अशा लाभार्थींंविरुद्ध पोलीस कारवाईसुद्धा केली आहे; मात्र प्रभाग १ मधील नागरिक शौचालयासाठी मागे राहू नये यासाठी न.प. उपाध्यक्ष वर्षा ढमाळ यांनी नागरिकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी प्रत्येक शौचालयामागे १ हजार रुपये खर्च करीत आहे. यामध्ये त्यांचे पती दीपक धमाळ हे लाभधारकाला जेसीबीने शौचालयाचा खड्डा तयार करून देत आहे. यामुळे या प्रभागात वैयक्तिक शौचालयाची संख्या नक्कीच वाढणार आहे.