माेताळा तालुक्यात ‘कहीं खुशी कहीं गम’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:36 AM2021-01-19T04:36:12+5:302021-01-19T04:36:12+5:30
पप्पु राठी मोताळा : तालुक्यातील ५० ग्रा.पं.साठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. दरम्यान, सोमवारी येथील तहसील ...
पप्पु राठी मोताळा : तालुक्यातील ५० ग्रा.पं.साठी १५ जानेवारी रोजी मतदान झाले होते. दरम्यान, सोमवारी येथील तहसील कार्यालयात मतमोजणी पार पडली. या निकालात अनेक प्रस्थापितांना धक्का बसला असून, अनेकांची लॉटरी लागली आहे. त्यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी परिस्थिती आहे.
तालुक्यातील मुदत संपलेल्या ५२ ग्रामपंचायतीची निवडणूक पार पडली. दरम्यान, कोल्हीगवळी व टाकळी घडेकर या दोन ग्रामपंचायतीसह ८३ उमेदवारांची अविरोध निवड झाली असून, सहा जागा रिक्त आहेत. त्यामुळे ५० ग्रा.पं.मधील ३८९ जागांसाठी ९४७ उमेदवारांनी निवडणूक लढवली. येथील तहसील कार्यालयात सोमवारी सकाळी आठ ते दुपारी दोन वाजेपर्यंत ८ टेबलांवर २१ फेऱ्यांमध्ये मतमोजणी पार पडली. याकरिता १६५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. मतमोजणीत अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागले. तालुक्यातील तीन उमेदवार एका मताच्या फरकाने तर एक उमेदवार दोन मताच्या फरकाने विजयी झाले. यात तपोवन येथील प्रभाग एक मधील माधुरी सुनील पाटील यांना १५७ मते (विजयी) तर, संगीता गोविंदा काकर यांना १५६ मते मिळाली. टाकळी वाघजाळ येथील प्रभाग तीन मधील नंदा मधुसूदन सपकाळ यांना १७४ मते (विजयी) तर, रूपाली वासुदेव शिराळ यांनी १७३ मते घेतली. पिंपळगाव देवी येथील प्रभाग एक मधील श्रद्धा शशिकांत पाटील यांना १४० मते (विजयी) तर, प्रमिला पांडुरंग पाटील यांना १३९ मते मिळाली. सारोळा मारोती येथील प्रभाग तीन मधील आरती सुगदेव शिपलकर यांना ३१५ मते (विजयी) तर, रमेश हरिभाऊ नरसते यांना ३१३ मते मिळाली आहेत. सारोळापीर येथील एक व आव्हा येथील एक उमेदवार दोन-दोन ठिकाणी निवडून आले आहेत. त्यामुळे येथील प्रत्येकी एक जागा रिक्त होणार आहे. तहसील प्रशासनाने १५२ टपाली मतपत्रिका वाटप केली होती. यातील १२२ मतदारांनी मतदान केले. तर, ३० मतदारांनी मतदानाकडे पाठ फिरवली. १२२ टपाली मतदानातून ११४ मते वैध ठरली. तर, ८ मते अवैध ठरली आहे. विजयी उमेदवारांसह कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून जल्लोष केला. मतमोजणीसाठी तहसीलदार एस.एम. चव्हाण, नायब तहसीलदार आशिष सानप यांच्या मार्गदर्शनात सतीश मुळे, सतीश घड्याळे, प्रशांत जवरे, तलाठी व इतर कर्मचाऱ्यांनी कामकाज पाहिले. मतमोजणी शांततेत पार पडली. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बोराखेडीचे पोलिस निरीक्षक माधवराव गरुड यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता.